यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाकडून ‘अबकी बार ४०० पार’अशी घोषणा देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ठिकठिकाणी प्रचार करताना ४००पार जागा जिंकून देण्याचं आवाहन मतदारांना करत आहेत. दरम्यान, भाजपा आणि मोदी यांच्याकडून करण्यात येत असलेल्या ४०० पार जागा जिंकण्याच्या दाव्यावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्याकडून शंका उपस्थित करण्यात आली आहे. भाजपाने आधीच काही तरी गडबड करून ठेवली आहे. त्यामुळे त्यांना ४०० जागा जिंकणार हे कळलंय, असा दावा प्रियंका गांधी यांनी केला आहे.
प्रियंका गांधी ह्या आज उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे रोड शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. तिथे त्या म्हणाल्या की, यांनी आधीच काहीतरी गडबड करून ठेवलेली आहे. तेव्हाच ४०० पार जागा जिंकणार हे कळलं आहे. जर देशामध्ये अशा निवडणुका झाल्या ज्यात ईव्हीएममध्ये कुठलीही गडबड झाली नाही तर मी ठामपणे सांगू शकते की, भाजपाला १८० पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. कदाचित त्यापेक्षा कमीच जागा त्यांना मिळतील, असा दावा प्रियंका गांधी यांनी केला.
सहारनपूरमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनी आज सहारनपूरमध्ये रोड शो केला. यावेळी त्या म्हणाल्या की, त्यांचे नेते प्रत्येक ठिकाणी सांगताहेत की, घटना बदलली जाणार आहे. जर घटना बदलली गेली तर आरक्षणाचं काय होणार? सर्वांच्या मताधिकाराचं काय होणार. याचं उत्तर दिलं पाहिजे. घाबरू नका, म्हणणं पुरेसं नाही. आम्ही तसेही तुम्हाला घाबरत नाही, असा टोलाही प्रियंका गांधी यांनी लगावला.