लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादम्यान नेतेमंडळींकडून मतदारांना संबोधित करत असताना वेगवेगळे दावे केले जात आहेत. तसेच मतदारांना वेगवेगळ्या माध्यमातून भावनिक आवाहनंही केली जात आहेत. सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांची पुतणी मारिया आलम खान यांचं फर्रुखाबाद येथे दिलेलं भाषण मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचारसभेला संबोधित करताना मारिया आलम यांनी मुस्लिम समाजाला एकजुटीने मतदान करण्याचं आवाहन करताना सांगितलं की एकजुटीने मतांचा जिहाद करा, कारण आपण केवळ मतांचा जिहादच करू शकतो.
मारिया आलम खान पुढे म्हणाल्या की, खूप हुशारीने, अजिबात भावनिक न होता एकदम शांततेत एकत्रितपणे मतांचा जिहाद करा. कारण आपण केवळ मतांचा जिहाद करू शकतो. त्या माध्यमातून या संघी सरकारला हटवण्याचं काम करू शकतो. काही मुस्लिमांनी मुकेश राजपूत यांची सभा घेतली हे ऐकून मला लाज वाटली. अशा लोकांचं खानपान बंद केलं पाहिजे.
मुस्लिमांना सल्ला देताना त्या पुढे म्हणाल्या की, एवढेही स्वार्थी बनू नका. मुलांच्या जीवनाशी खेळू नका. आज कितीतरी लोक सीएए-एनआरसीमधून तुरुंगात बंद आहेत. त्यामधील अनेकांचे खटले सलमान खुर्शिद साहेब मोफत लढत आहेत.
लोक सांगताहेत की संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे. पण मी सांगते की, मानवता धोक्यात आहे. आता मानवतेवर हल्ला होत आहे. जर तुम्हाला तुमच्या देशाला वाचवायचं असेल, आपल्या देशाचं सौंदर्य वाचवायचं असेल, गंगा जमनी तहजीब वाचवायची असेल तर यावेळी पूर्ण शुद्धीत राहून मत द्या. कुणाच्याही सांगण्यामध्ये अडकू नका. तुमचा समजूतदारपणाच आता आपल्या देशाला वाचवू शकेल.