लखनौ - विवाह सोहळ्याच्या काही दिवसांपूर्वी बाईक आणि सोन्याच्या साखळीची मागणी करणाऱ्या नवरदेवाला चांगलीच अद्दल घडवली आहे. अशी अद्दल घडवली आहे की तो आयुष्यभर ती विसरू शकणार नाही. या विषयाची चर्चा सध्या संपूर्ण उत्तर प्रदेशात सुरू आहे. मुलीच्या कुटुंबीयांकडे बाईक आणि सोनसाखळीची मागणी करणाऱ्या या नवरदेवाचं लग्नाच्या दिवशीच मुंडण करण्यात आलं. मुंडण केलेल्या या नवरदेवाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मुलीच्या आजीनं सांगितले की, नवरदेवानं लग्नाच्या 5 दिवसांपूर्वी बाईक आणि सोन्याची साखळी देण्याची मागणी केली. या मागण्यांची पूर्तता करण्याचेआम्ही फेटाळून लावल्यानंतर नवरदेवानं लग्न करण्यास नकार दिला. यानंतर लग्नाच्याच दिवशी त्याचे केस कापण्यात आल्याची माहिती मिळाली. पण त्याचे केस कोणी कापले हे आम्हाला माहिती नाही.
मुलाचे केस आम्ही कापले नाहीत, असे स्पष्टीकरण मुलीच्या कुटुंबीयांकडून देण्यात येत आहे. पण, हुंडा मागणाऱ्या या लालची नवरदेवाचं मुंडण केले तरी कोण?, हा प्रश्न सध्या अनुत्तरितच आहे.
हुंड्याचे हे प्रकरण आता पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. विशेष म्हणजे लग्नाच्याच दिवशी नवरदेवाचे केस कोणी कापले?, यामागील सूत्रधार कोण?, याची माहिती कोणालाच माहीत नाही. लग्नाच्या दिवशी जेव्हा मुलाच्या मागण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत, तर त्यानं थेट लग्नास नकार दिला.
लग्न न करण्याची मुलानं दिलेली कारणं ऐकाल तर संताप होईल. मुलगी व्हॉट्सअॅपवर अधिक वेळ असते, असे सांगत त्यानं सुरुवातीस लग्न करण्यास नकार दिला. यानंतर त्यानं 65 लाख रुपयांची मागणी केली. त्याच्या मागण्या हनुमानाच्या शेपटीसारख्या वाढत असल्याचे पाहून अखेर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. याप्रकरणी सध्या पोलीस तपास करत आहेत.