लखनौ -उत्तर प्रदेशपोलिसांनी 10 वर्षांत तब्बल 8 जणांशी लग्न करणाऱ्या नवरीला अटक केली आहे. ही नवरी लग्नानंतर घरातील सर्व दागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार होत होती. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी ही कारवाई केली. या लुटारू नवरीचे नाव मोनिका मलिक असल्याचे समोर आले आहे.
या धोकेबाज महिलेने एका 66 वर्षांच्या बिल्डरला निशाणा बनवले होते. लग्नानंतर ती आपल्या या 8व्या पतीचे 15 लाख रुपयांचे सामान घेऊन फरार झाली होती. या व्यक्तीचे नाव जुगल किशोर असे आहे. ते गाझियाबाद येथील रहिवासी आहेत. गेल्यावर्षी त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने आणि त्यांचा मुलगाही वेगळे राहू लागल्याने त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
जुगल किशोर यांनी खन्ना विवाह संस्थेशी साधला होता संपर्क -यासाठी त्यांनी दिल्लीतील खन्ना विवाह संस्थेशी संपर्क साधला होता. यानंतर मेट्रोमोनियल साईटच्या वतीने जुगल किशोर आणि मोनिका मलिक यांची भेट घडवण्यात आली. यावेळी तिने आपण घटस्फोटित असल्याचे सांगितले होते. काही आठवड्यांनंतर 2019 मध्ये या दोघांनीही न्यायालयात लग्न केले होते.
यानंतर दोन महिन्यांतच ही लुटारू नवरी घरातून दागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार झाली. यानंतर जुगल किशोर यांनी संबंधित मेट्रोमोनियल साईटशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी जुगल किशोर यांनाच धमकावले. यानंतर त्यांना मोनिकाच्या पहिल्या पतीसंदर्भात माहिती मिळाली. त्यालाही मोनिकाने असेच गंडवले होते.
हे सर्व विवाह खन्ना विवाह संस्थेनेच निश्चित केले होते -यानंतर किशोर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मोनिका विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास केला असता या नवरीने 10 वर्षांत तब्बल 8 लग्न केल्याचे आणि सर्वांना, याच पद्धतीने लुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विशेष म्हणजे हे सर्व विवाह खन्ना विवाह संस्थेनेच निश्चित केले होते.
यानंतर पोलिसांनी मोनिका, तिचे कुटुंबीय आणि मेट्रोमोनियल संस्थेविरोध आयपीसी कलम 419, 420, 380, 384, 388 आणि 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.