कुशीनगर:उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील नारायणी नदीत मजुरांनी भरलेली बोट उलटून मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात बोटीतील 9 महिलांसह सर्व 10 जण बुडाले असून, 3 जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने अपघाताच्या वेळी काही मच्छीमार जवळच मासेमारी करत होते, त्यांनी तात्काळ नदीत उडी मारुन 7 जणांना वाचवले.
ही घटना कुशीनगर जिल्ह्यातील खड्डा पोलीस ठाणे हद्दीतील सालिकपूर चौकीजवळील गंडक नदीतून उगम पावणाऱ्या नारायणी नदीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीवरील हे लोक शेती करण्यासाठी जात असताना बोट अनियंत्रित होऊन उलटली. या अपघातात बोटीवरील सर्व 10 जण नदीत बुडाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एस राजलिंगम आणि एसपी सचिंद्र पटेल घटनास्थळी पोहोचले. तर, खड्ड्याचे आमदार विवेकानंद पांडेही घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीची माहिती घेतली.
7 जणांन वाचवण्यात यशया अपघातात 7 जणांना तात्काळ नदीतून बाहेर काढण्यात आले, मात्र दोन मुली आणि एक महिला कुठेच सापडली नाही. त्यांना शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुन्हा पाणबुड्यांची मदत घेतली, त्यानंतर तिघींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या तिघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.