हापूड: उत्तर प्रदेशातल्या हापूड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाच्या पोटात अचानक दुखू लागल्यानं त्याला रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यानं इंजेक्शन दिलं. इंजेक्शन देताच तरुण तडफडू लागला आणि लगेचच त्याचा मृत्यू झाला. तरुणाचा मृत्यू सीसीटीव्हीत कैद झाला. आता रुग्णालय कर्मचाऱ्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हापूडमधल्या स्टार न्यू भारत रुग्णालयात हा प्रकार घडला. हे रुग्णालय गढमुक्तेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं. एक तरुण त्याच्या काकीला घेऊन रुग्णालयात गेला होता. त्याच दरम्यानत तरुणाच्या पोटात दुखू लागलं. रुग्णलयातील कर्मचाऱ्यांनी तरुणाला वेदनाशामक इंजेक्शन दिलं. त्यानंतर तरुण तडफडू लागला. त्यानंतर पुढच्या काही वेळातच त्यानं अखेरचा श्वास घेतला.
रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हा संपूर्ण प्रकार रेकॉर्ड झाला. घटना घडत असताना रुग्णालयाच्या संचालिकादेखील तिथे उपस्थित होत्या. या प्रकरणी तरुणाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
तरुणाला कोणतं इंजेक्शन देण्यात आलं, त्याला नेमका कोणता त्रास सुरू होता, याचा शोध घेण्यासाठी रुग्णालयात एक पथक पाठवण्यात आल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी रेखा शर्मांनी दिली. पथकानं अहवाल दिल्यानंतर दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं. मात्र त्यातून मृत्यूचं कारण स्पष्ट झालं नाही. त्यामुळे विसेरा सुरक्षित ठेवण्यात आला आहे, अशी माहिती गढमुक्तेश्वरचे डीसीपी पवन कुमार यांनी दिली.