आग्रा - ऑफिसमध्ये महिनाभर जीव ओतून, मरमर काम केल्यानंतर महिन्याच्या अखेरीस हातात केवळ एक आकडी पगार आला तर तुम्ही काय कराल?... ऑफिसमध्ये बॉससोबत वाद घालणार, आपल्या पदाचा राजीनामा द्याल किंवा गप्प बसाल. पण उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एक अजबच प्रकार घडला आहे. येथील 30 वर्षीय एका युवकाला महिनाभरानंतर पगार म्हणून केवळ 6 रुपयेच मिळाले. यामुळे निराश झालेल्या या युवकानं ऑफिसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याचा जीव वाचवला.
सिकंदरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका फॅक्टरीमधील ही घटना आहे. सिंकदरा पोलीस स्टेशनचे अधिकारी अजय कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येचा प्रयत्न करणारा युवक कित्येक वर्षांपासून या फॅक्टरीमध्ये कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्याच्या गर्तेत होता. याचदरम्यान, 27 जुलैला त्याचा अपघातही झाला. ज्या हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले होते, तेथील औषधोपचाराचा सर्व खर्च त्याच्या ऑफिस मालकानं केला. काही दिवसांच्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
प्रकृती ठीक झाल्यानंतर हा युवक उत्साहानं पुन्हा कामाला लागला. त्यानं कार्यालय गाठलं आणि ऑफिसमध्ये जाऊन गेल्या महिन्यातील पगाराची मागणी केली. मात्र हातात आलेला पगार पाहून त्याला जबर धक्का बसला. कारण फॅक्टरीच्या मालकानं त्याला पगार म्हणून केवळ 6 रुपयेच दिले. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हॉस्पिटलचा जो काही खर्च झाला आहे, तो खर्च पगारातून हप्त्यांमध्ये कापण्याची विनंती युवकानं मालकाकडे केली.
वारंवार विनंती करुनही मालकानं मात्र त्यास नकार दिला. यामुळे परिस्थितीसमोर हतबल झालेल्या युवकानं फॅक्टरीमध्येच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सतर्क असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेत केला आणि त्याचा जीव वाचवला. यानंतर त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
समस्येवर असा निघाला तोडगापोलिसांच्या मध्यस्थीमुळे युवक आणि फॅक्टरी मालकातील वादाचा गुंता अखेर सुटला आहे. ऑफिसनं केलेला खर्च युवकाच्या पगारातून कापून घेण्यासाठी मालकानं तयारीही दर्शवली आहे. शिवाय, याप्रकरणी कोणीही पोलिसांकडे तक्रारदेखील केलेली नाही.