लखनऊ - विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू झाल्या आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र उत्तर प्रदेशमध्ये महाविद्यालयाच्या व्यवस्थापकांनी चक्क विद्यार्थ्यांना परीक्षेत कॉपी करण्याचा सल्ला दिला आहे. 'पेपरमध्ये 100 रुपये ठेवा, घाबरू नका' असं सांगणाऱ्या महाविद्यालयाच्या व्यवस्थापकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशच्या मऊ जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. व्यवस्थापकाने विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान न घाबरता बिनधास्त कॉपी कशी करायची याचे अनेक सल्ले दिले आहेत. सध्या परीक्षा सुरू असल्याने या व्हायरल व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मऊ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ज्ञान प्रकाश त्रिपाठी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. 'आम्ही या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली असून याचा तपास केला जात आहे. तपासादरम्यान गोष्टी समोर आल्या की याबाबत कठोर कारवाई केली जाईल' अशी माहिती त्रिपाठी यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मऊ जिल्ह्यातील मधुबनमध्ये हरिवंश मेमोरियल इंटर कॉलेज आहे. या महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रविण मल्ल यांनी बोर्ड परीक्षेआधी विद्यार्थ्यांसाठी एका फेअरवेल पार्टीचं आयोजन केलं होतं.
फेअरवेल पार्टीदरम्यान प्रविण मल्ल यांनी विद्यार्थ्यांना कॉपी करण्याचा सल्ला दिला. तसेच परीक्षेदरम्यान न घाबरता बिनधास्त कॉपी कशी करायची हे सांगितले. 'पेपर लिहिताना घाबरण्याची गरज नाही. एकमेकांशी बोला. उत्तरं विचारा. परीक्षा केंद्रवरील सर्व शिक्षक माझे मित्र आहेत. जर कॉपी करताना पकडले गेलात आणि कोणी मारलं तर घाबरून नका. सहन करा. सर्व प्रश्नांची उत्तरं लिहा. चुकीचं उत्तर लिहिलं असलं तरी मार्क मिळतील' असं प्रविण मल्ल यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.
'परीक्षेत अनेक प्रश्न हे विचारण्यात आलेले असतात. त्यातील सर्व प्रश्नांची उत्तर द्या. जर उत्तर लिहिता आलं नाही, तर उत्तर पत्रिकेत 100 रुपये ठेवा. पेपर तपासताना शिक्षक डोळे झाकून मार्क देतील. सध्या परीक्षेत स्टेप मार्कींग असतं. त्यामुळे जेवढं लिहीता येईल तेवढं लिहा म्हणजे जास्त मार्क मिळतील' असं देखील मल्ल यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Breaking: स्वतः कोर्टात हजर झालेल्या देवेंद्र फडणवीसांना दिलासा; जामीन मंजूर
राम मंदिरासाठी ट्रस्ट बनवली, मग मशिदीसाठी का नाही? शरद पवार यांचा सवाल
तामिळनाडूमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 19 जणांचा मृत्यू
जर्मनीच्या दोन बारमध्ये गोळीबार; ८ जणांचा मृत्यू
कमल हासनच्या इंडियन 2च्या सेटवर भीषण अपघात, तीन ठार