मुझफ्फरनगर: लग्न म्हणजे दोन मनाचं मीलन असतं. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं लग्नाच्या परंपरा आणि रीतिरिवाज पार पाडत असतो. हिंदूंमध्ये लग्न सोहळ्यात नवरदेवाचे बूट लपवण्याची एक पद्धत असते. मुजफ्फरनगरमध्ये हीच पद्धत एक लग्न मोडण्यास कारण ठरली आहे. मेहुणीनं बूट लपवल्यामुळे नवरदेवाला प्रचंड राग आला आणि त्यानं नवरी मुलीकडच्यांना भर मंडपातच खडे बोल सुनावले. एवढ्यावरच न थांबता ते लग्न मोडल्यामुळे नवरी मुलीला सिसोलीतून दिल्लीत माघारी परतावं लागलं.त्याचं झालं असं की, लग्नसोहळ्यात वधूपक्षाकडील काही तरुणींनी आणि महिलांनी नवरदेवाचे बूट लपवले. ते परत करण्यासाठी नवरदेवाकडे पैशांची मागणी केली. नवऱ्या मुलानं पैसे न देता वधूकडच्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर खूप मोठा वाद झाला. वधूकडच्या मंडळींनी नवरदेवाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु नवरदेवानं अपशब्द वापरत त्यांचा अपमान केला, तसेच वधूकडच्या एका व्यक्तीच्या श्रीमुखात भडकावली. हा सगळा प्रकार नवरी मुलीला समजल्यानंतर तीसुद्धा भडकली. तिनंही घरच्या मंडळींना हे लग्न मोडण्याचा सल्ला दिला. तसेच हुंडा म्हणून दिलेले दहा लाख रुपये परत करण्याचे मान्य केल्यानंतरच नवरदेवासह वरातीसह जाण्यास दिले. भोराकला पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, लग्नसोहळ्यातील वादाबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस अधिकारी वीरेंद्र कसाना यांनी सांगितले, नवरा मुलगा किंवा नवरी मुलगीकडून कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. पोलीस ठाण्याबाहेरच दोन्हीकडील मंडळींनी वाद मिटवला. या नवरी मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता ती लग्नास तयार नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं
ऐकावं ते नवलच! बूट लपवणं पडलं महागात; नवरीनं चक्क लग्नच मोडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 4:07 PM