नवी दिल्ली:उत्तर प्रदेशमध्ये 69 हजार सहाय्यक शिक्षकांच्या भरतीचे प्रकरण जोर धरत आहे. अनियमिततेचा आरोप करत उमेदवार सातत्याने आंदोलन करत आहेत. दरम्यान, लखनऊमध्ये कँडल मार्च काढणाऱ्या उमेदवारांवर पोलिसांनी लाठीमार केला. यानंतर राजकीय वर्तुळात याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे. रविवारी भाजप खासदार वरुण गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करुन आपल्याच सरकारवर प्रश्न उपस्थित केला आहे. विरोधकही या प्रकरणावरुन भाजप सरकारवर टीका करताना दिसत आहेत.
भाजप खासदार वरुण गांधी लाठीचार्जचा व्हिडिओ पोस्ट करत म्हणाले की, 'ही तुमची मुलं असती तर त्यांनाही अशीच वागणूक दिली असती का?ही मुले भारतमातेचे लाल आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवणे तर दूरच, कोणीही त्यांच म्हणणं ऐकायला तयार नाही. त्यातच त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केला गेला. मनावर हात ठेवून विचार करा की ही तुमची मुलं असती तर त्यांनाही अशीच वागणूक मिळाली असती का?' असा सवाल त्यांनी विचारला आहे.
विरोधी पक्षांनी सरकारला घेरले
काही दिवसांपूर्वीच UPTET भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये यूपी पोलिसांनी 26 हून अधिक आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणावरुन काँग्रेस, समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला घेरण्याची एकही संधी सोडली नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करुन म्हटले- 'यूपी सरकारने रोजगार शोधणाऱ्यांवर लाठीमार केला. भाजप मते मागायला आल्यावर हे लक्षात ठेवा!' यासोबतच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनीही यूपी सरकारवर हल्लाबोल केला आहे.