यूट्युबवरील व्हिडीओ माहिती पाहून काही उचापती लोक स्वत:वरच घरगुती उपचार करत असतात. मात्र एका तरुणाने यूट्युबवरील व्हिडीओ पाहून चक्क स्वत:च शस्त्रक्रिया केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे एका तरुणाच्या पोटात दुखू लागल्यावर या तरुणाने स्वत:च स्वत:चं पोट कापून शस्त्रक्रिया केली.
यासाठी या तरुणाने इंटरनेटवर सर्च करून शस्त्रक्रियेबाबत युट्युबवरून माहिती घेतली. त्यानंतर मेडिकलमधून शस्त्रक्रियेआधी भूल देण्यासाठी लागणारं इंजेक्शन, सर्जिकल ब्लेड, स्टिचिंगचं सामान, असं साहित्य खरेदी केलं. घरी पोहोचल्यावर त्याने खोलीत जाऊन प्रथम स्वत:ला भूल देणारं इंजेक्शन टोचून घेतलं. त्यानंतर पोट कापून आतड्यांना चीर मारली. तसेच स्वत:च १२ टाकेही घातले. मात्र यादरम्यान सर्जिकल ब्लेड पोटाल खोलवर गेल्याने जखम होऊन त्याची प्रकृती बिघडू लागली. ही बाब जेव्हा त्याच्या कुटुंबीयांना समजली तेव्हा त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला आग्रा येथे अधिक उपचारांसाठी पाठवले. सद्यस्थितीत या तरुणाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी याच्यावर अपेंडिसची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतरही त्याला पोटदुखीचा त्रास सुरू होता. त्याची अल्ट्रासाऊंड चाचणी केली असता ती सामान्य आली होती. मात्र तरीही त्रास सुरू असल्याने त्याने स्वत:च स्वत:वर शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्रास वाढला तेव्हा नातेवाईकांना सांगितले. सद्यस्थितीत त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.