ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 17 - उत्तर प्रदेश सरकारने मांस विक्री करणा-या दुकानांसाठी काही मार्गदर्शकतत्त्वे जारी केली आहेत. मांस विक्री करणारी दुकानं आता धार्मिक स्थळांपासून कमीतकमी 50 मीटर अंतरावर उघडता येणार नाहीत, असे निर्देश याद्वारे देण्यात आले आहेत. धार्मिक स्थळांच्या प्रवेश द्वारापासून जवळपास 100 मीटर दूर अंतरावर मांस विक्रीची दुकानं असावीत, असं उत्तर प्रदेश सरकारने सांगितले आहे. विशेष म्हणजे या धार्मिक स्थळांच्या यादीत मशिदींचाही समावेश करण्यात आला आहे.
फूड सेफ्टी अँड ड्रग्स अॅडमिनिस्ट्रेशन (FSDA)च्या अधिका-यांनी सांगितले की, धार्मिक स्थळांमध्ये मशिदींचाही समावेश असेल. यापूर्वी मशिदींची जबाबदारी असणा-या व्यक्तींनी मांस विक्रीची दुकानं मशिदीच्या आसपास असण्यावर कधीही आक्षेप नोंदवला नाही. या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या या मार्गदर्शक तत्त्वांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
FSDAच्या अधिकारी ममता कुमारी यांनी सांगितले की, मशिददेखील एक धार्मिक स्थळ आहे आणि सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोणत्याही मशिदीच्या आसपास मांस विक्री दुकानांना परवाना देण्यात येणार नाही. भलेही मशिद प्रशासनाद्वारे अशा दुकानांना परवानगी देण्यात आली असली तरीही त्या दुकानांना सरकारद्वारे जारी करण्यात आलेला नियम लागू होतो.
ममता कुमारी यांनी असेही सांगितले की, जवळपास 1,340 लोकांनी मांस विक्रीची दुकानं चालवता यावी, यासाठी परवाना शुल्क भरले असून शेकडो लोकं अजूनही रांगेत आहेत. यातील 250 अर्ज ही मशिदींजवळ दुकानं सुरू करण्यासंबंधी आहेत. या सर्व अर्जदारांनी संबंधित मशिद प्रशासनाकडून ना हरकत प्रमाणपत्रही मिळवले आहे. मात्र, या अर्जदारांना परवाने जारी करता येणार नाहीत, असा निर्णय सरकारनं घेतला आहे.
या निर्णयातून काही प्रमाणात सुट मिळावी यासाठी सामाजिक संघटन अमन कमिटीतील सदस्यांना FSDAच्या अधिका-यांची भेट घेतली. काही ठिकाणी मशिदींतर्फे भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या खोल्यांमध्ये मांस विक्रीची दुकानं सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी या भेटीदरम्यान अधिका-यांनी दिली.