बाराबांकी: उत्तर प्रदेशच्या बाराबांकीमध्ये प्लास्टिकच्या तांदळामुळे एकच खळबळ माजली आहे. शिधावाटप दुकानातून प्लास्टिकचे तांदूळ मिळत असल्याची बातमी पसरल्यानं ग्रामस्थ चिंतेत आहेत. शिधावाटप दुकानातून मिळालेल्या तांदळातील काही तांदूळ वेगळे दिसत असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. तांदूळ शिजवल्यानंतर त्यातून त्यातून चिकट पदार्थ निघत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
शिधावाटप दुकानातून मिळालेला तांदूळ खाण्यास आता ग्रामस्थ तयार नाहीत. याबद्दल अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, गोदामातून आणलेले तांदूळ ग्रामस्थांनी वाटल्याचं त्यांनी सांगितलं. तांदळाबद्दल काही तक्रार असल्यास तपास केला जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. बाराबांकीत असलेल्या फपुरवा खानपूरमध्ये असलेल्या शिधावाटप दुकानाशी संबंधित हा संपूर्ण प्रकार आहे.
शिधावाटप दुकानातून मिळालेल्या तांदळात प्लास्टिक तांदळाचे दाणे आढळून आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. ही बातमी गावात वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि एकच खळबळ माजली. तांदळात भेसळ झाल्याचा आरोप मैदासपूरच्या ग्रामस्थांनी केला. शिधावाटप दुकानातून तांदूळ घेऊन गेलेल्या अनेकांनी तो पुन्हा दुकानात जमा केला. याआधी दुकानातून कधीच अशा प्रकारचा तांदूळ मिळाला नव्हता, असं ग्रामस्थांनी सांगितलं.
शिधावाटप दुकानातून मिळालेल्या तांदळात प्लास्टिकचे दाणे सापडल्याचं मैदासपूर गावात वास्तव्यास असलेल्या शकुंतला देवींनी सांगितलं. तांदळाला कोणतीच चव नाही. यामुळे मुलं आजारी पडू शकतात, अशी भीती त्यांनी वर्तवली. आम्ही हा तांदूळ जनावरांनादेखील खायला घालणार नाही, असं शंकुतला देवींनी सांगितलं.