नवी दिल्ली - लखीमपूर खिरीच्या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शेतकरी आंदोलनात वाहन शिरल्याने काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर काही शेतकरी जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे, येथील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेल्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना पोलिसांनी अटक केल्याचे माहिती युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनी ट्विटरवरुन दिली आहे. प्रियंका गांधी यांच्यानंतर आता समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी देखील शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर पोलिसांनी त्यांना स्थानबद्द करण्याचा प्रयत्न केला आहे. अखिलेश यांच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अखिलेश यादव यांना रोखण्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या घराबाहेर धरणे आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी अखिलेश यांना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव लखनऊमध्ये त्यांच्या घराजवळ आंदोलनासाठी बसले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. अखिलेश यादव लखीमपूर खिरीला जात असताना त्यांना यूपी सरकारच्या आदेशावर पोलिसांनी रोखले, असा दावा पक्षाने केला. त्यानंतर शेकडो सपा समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. अखिलेश यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांच्या वाहनाला आग लावण्याची घटना घडली आहे. ही घटना घटनास्थळापासून काही मीटर अंतरावर घडली आहे.
"हे सरकार शेतकर्यांवर ज्या प्रकारचे अत्याचार करतंय तसे अत्याचार इंग्रजांनी सुद्धा केले नाहीत"
सोशल मीडियावर या घटनेचे काही व्हिडीओ हे जोरदार व्हायरल होत आहेत. एका व्हि़डीओमध्ये गाडीला लावण्यात आलेली आग पोलीस विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. हे कोणी केले माहीत नाही. आम्ही आत गेलो तेव्हा कोणीतरी हे केल्याचं देखील पोलिसांनी म्हटलं आहे. अखिलेश यादव यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच याप्रकरणी मंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. "हे सरकार शेतकर्यांवर ज्या प्रकारचे अत्याचार करत आहे, तसे अत्याचार इंग्रजांनी सुद्धा केले नाहीत. गृह राज्यमंत्री अजय मिश्रा आणि उपमुख्यमंत्री (केशव प्रसाद मौर्य) यांनी राजीनामा द्यावा" असं अखिलेश यांनी म्हटलं आहे.
"तू मागे हटणार नाहीस, ते तुझ्या हिमतीने भयभीत झालेत"
"मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दोन कोटी रुपये आणि सरकारी नोकऱ्या दिल्या पाहिजेत" असं देखील सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल यांनी ट्विट करून प्रियंका गांधींना हिंमत ठेवून मागे न हटण्यास सांगितलं आहे. तसेच "प्रियंका, मला माहीत आहे की तू मागे हटणार नाहीस. ते तुझ्या हिमतीने भयभीत झाले आहेत. न्यायासाठीच्या या अहिंसक लढाईत आपण देशाच्या अन्नदात्याला विजयी करू" असं देखील राहुल गांधींनी म्हटलं आहे.