Hathras Stampede :उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन तब्बल १२१ भाविकांचा मृत्यू झाला. नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा याच्या प्रवचनासाठी आलेल्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उत्तर प्रदेश पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सेवेकरी देव प्रकाश आणि अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. दुसरीकडे हाथरसचे उप जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची संपूर्ण माहिती दिली.
मंगळवारी दुपारच्या सुमारास उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात भोले बाबाच्या सत्संग कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि मुलांचे प्रमाण अधिक आहे. या कार्यक्रमात दोन ते अडीच लाखाच्या आसपास भाविक आले होते. भोले बाबाचे प्रवचन संपल्यानंतर त्याचा स्पर्श झालेली माती गोळा करण्याकरता भाविकांनी एकच गर्दी जमली. यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि १२१ लोकांचा मृत्यू झाली तर अनेकजण जखमी झाले. आता उपजिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घडलेल्या घटनेबाबत विस्तृत माहिती दिली.
"सत्संग सुरु असलेल्या ठिकाणी दोन लाखांहून अधिक लोक उपस्थित होते. दुपारी १२.३० वाजत नारायण साकार हरी (भोले बाबा) सत्संग मंडपात पोहोचले आणि हा कार्यक्रम एक तास चालला. त्यानंतर दुपारी १.४० च्या सुमारास नारायण साकार हरी (भोले बाबा) मंडपामधून बाहेर पडले. महामार्ग-९१ ज्या मार्गाने भोले बाबा बाहेर पडत होते. सत्संगी स्त्रिया/पुरुष/मुले इत्यादींनी त्याच्या पायाची माती घेऊन दर्शनाची खूण म्हणून कपाळावर लावली व चरणस्पर्श करून आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. त्यावेळी बाजूला व मध्यभागी बांधलेल्या दुभाजकावर मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी उभे होते. जी.टी.रोड, दुभाजकावरून जेव्हा लोक उड्या मारून बाबाच्या वाहनाकडे धावू लागले. गर्दी बाबांपर्यंत पोहोचू नये म्हणून त्यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी आणि सेवेकऱ्यांनी काही लोकांना धक्काबुक्की केली आणि ते खाली पडले. त्यामुळे तो जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि घाबरला. तिथून बाहेर पडण्यासाठी लोकांनी जवळच असलेल्या मोकळ्या मैदानाकडे धाव घेतली जिथे अनेक लोक एका उतारावरुन घसरले आणि खाली पडले. इतर लोक त्यांच्या अंगावरुन धावू लागले. यामुळे ते पुन्हा उठून उभे राहू शकले नाहीत आणि गर्दी त्याच्या अंगावरुन इकडे तिकडे धावू लागली. ज्यामध्ये अनेक महिला, पुरुष आणि मुले जखमी/गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित महसूल व पोलीस सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लोकांना रूग्णवाहिका व इतर माध्यमातून सिरळ येथील घटनास्थळाजवळील रूग्णालये आणि सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवले. जिथे ८९ भाविकांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आणि काही भाविकांना उपचारासाठी एटा जिल्ह्यात पाठवण्यात आले. तिथे २७ भाविकांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अशा प्रकारे, एकूण मृतांची संख्या ११६ वर पोहोचली आणि एकूण २३ लोक जखमी झाले," अशी माहिती उपजिल्हाधिकारी सिकंदर राव यांनी दिली.
दरम्यान, या कार्यक्रमाची प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आली होती. मात्र आयोजकांकडून केवळ ८० हजार लोक येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाने कार्यक्रमस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र कार्यक्रमाच्या दिवशी अडीच लाखांहून अधिक भाविक सत्संगसाठी आले होते. त्यानंतरही आयोजकांनी भाविकांची संख्या पोलिसांपासून लपवून ठेवली. मात्र सकाळपासूनच कार्यक्रमाचे सुरु असताना अडीच लाख लोकांची गर्दी पोलिसांना कशी दिसली नाही असाही सवाल आता केला जात आहे.