अलीगडमध्ये एक ह्दयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी १५ दिवसांपासून भूकेने व्याकुळ असलेल्या ६ जणांच्या कुटुंबाला रेस्क्यू करण्यात आलं आहे. सामजिक संघटना हँड फॉर हेल्थ ज्यावेळी या कुटुंबाच्या घरी पोहचली तेव्हा घरातील महिला आणि ५ लहान मुलं अत्यंत बिकट अवस्थेत होते. या लोकांमध्ये बोलण्याचीही ताकद नव्हती. संघटनेच्या लोकांना पाहताच या सर्वांच्या डोळ्यातून पाणी आले.
सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने पोलीस, प्रशासनाच्या मदतीने या सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने ग्रामसेवक आणि रेशन व्यावसायिकाविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. अलीगडच्या नगला मंदिर परिसरात राहणाऱ्या गुड्डा देवी हिचा पती बिजेंद्र कुमार यांचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. ती मोलमजुरी करून तिच्या ५ मुलांचा सांभाळ करत होती. परंतु लॉकडाऊनमुळे तिचा रोजगार हिरावला. कसंतरी या महिलेने काही दिवस घर चालवलं पण पैसे संपल्यानंतर आजूबाजूच्या लोकांकडे पैसे मागून मुलांचे पोट भरण्याचं काम केले.
काही दिवसांनी लोकांनी मदत करण्यापासून नकार दिला. मागील १५ दिवसांपासून महिला तिच्या ५ मुलांसह उपाशी आहे. घरात खाण्यासाठीही काही नाही. केवळ पाणी पिऊन संपूर्ण कुटुंब मृत्यूशी झुंज देत आहे. गुड्डीदेवी यांच्या ५ मुलांपैकी सर्वात मोठा २० वर्षीय अजय आहे. आईची नोकरी गेल्यानंतर अजय मजुरी करून घर सांभाळत होता. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्याचंही काम बंद झालं. अजयच्या कमाईनं १६ वर्षीय विजय, १३ वर्षीय अनुराधा, १० वर्षीय दीपू आणि ४ वर्षीय टीटू यांचे पालनपोषण होत होतं.
परिसरातील लोकांनी सामाजिक संघटनांना बोलावलं
अनेक दिवसांपासून गुड्डी देवी आणि तिची मुलं घराबाहेर दिसली नसल्याने लोकांनी सामाजिक संघटनांना फोन केला. संघटनेचे अध्यक्ष सुनील कुमार सदस्यांसह गुड्डी देवीच्या घरी पोहचले. त्यानंतर गुड्डी देवी आणि तिच्या मुलांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. भुकेने व्याकुळ झालेल्या कुटुंबाला पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. या मुलांची अवस्था पाहिली तर त्याचा अंदाज लावता येऊ शकतो.
सरकारच्या दाव्याची पोलखोल
उत्तर प्रदेश सरकारचा दावा होता की, लॉकडाऊनमुळे नोकरी गेलेल्यांना मोफत रेशन आणि मनरेगामधून काम दिलं जाईल. परंतु अलीगडमधून आलेले फोटो पाहून या दाव्याची पोलखोल होत आहे. या कुटुंबाकडे ना रेशन कार्ड आणि ना आधार कार्ड. सामाजिक संघटनांनी या कुटुंबाचे वास्तव समोर आणताच जिल्हा प्रशासन हादरलं त्यांनी तात्काळ या महिलेचे रेशन कार्ड बनवण्याचे आदेश दिले आहेत. या महिलेची कहाणी समोर आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये मदत करणाऱ्यांनी गर्दी केली. सपाने या कुटुंबाला आर्थिक मदत केली तर अन्य एका संस्थेने दोन महिन्याचं रेशन कुटुंबाला देऊ केले.