लखनऊ : उत्तरप्रदेशमधील बिजनोर जिल्ह्यातील एका केमिकल फॅक्टरीत सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिजनोर जिल्ह्यातील मोहित पेट्रो केमिकल फॅक्टरी आहे. या फॅक्टरीत बुधवारी सकाळी सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला, तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे. याचबरोबर, स्फोटानंतर तीन जण बेपत्ता झाले आहेत. ही दुर्घटना मोहित पेट्रो केमिकल कारखान्यात घडली. हा कारखाना कोटवली शहरातील नगिणा रस्त्यावर आहे. जेव्हा हा स्फोट झाला, तेव्हा येथील कर्मचारी मिथेन गॅस टँक दुरुस्त करत होते. त्यावेळी हा भीषण स्फोट झाला. यामध्ये सहा कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, असे बिजनोरचे पोलीस अधीक्षक उमेश कुमारसिंग यांनी सांगितले.
दरम्यान, कमलवीर, लोकेंद्र, रवी, चेत्रम, विक्रांत आणि बाळ गोविंद या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. तर, कपिल, परवेज आणि अभय राम हे तिघे जण स्फोटानंतर बेपत्ता झाले आहेत. तसेच, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नाही. मात्र, पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे.