- मीना कमल, लखनौ
उत्तर प्रदेशात केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांना भाजपा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर आणणार आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नावावर मोहर लावली. आसाममधील विजयामुळे उत्साह संचारलेल्या भाजपाने उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती बदलण्याचे संकेत दिले आहेत. या राज्यात मुख्य प्रचारक मोदी यांच्यासोबतच मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून इराणी यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाईल. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारासाठी उत्तर प्रदेशातील भाजपा नेत्यांमध्ये सुरू झालेली स्पर्धा पाहता, केंद्रीय नेतृत्वाने कोणताही उमेदवार घोषित न करण्याचा निर्णय घेतला होता. या पदासाठी नाव घोषित केल्यामुळे नव्या वादाला जन्म दिला जाईल, अशी शंका व्यक्त केली जात होती. सपा-बसपाच्या रांगेत भाजपा...नोव्हेंबरमध्ये इराणी यांच्या नावाची घोषणा झाल्यास समाजवादी पक्ष आणि बसपानंतर भाजपा मुख्यमंत्रिपदासाठी उमेदवार घोषित करणारा तिसरा पक्ष ठरणार आहे. भाजपाने या राज्यात यापूर्वी कधीही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणला नव्हता. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बसपाच्या मायावती यांच्या रूपाने उमेदवार जनतेसमोर आले आहेत.कल्याणसिंगांच्या नावावर विचारमंथन... उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदासाठी जंग छेडली जाताच कल्याणसिंगांच्या नावावर विचारमंथन झाले आहे. पुन्हा राममंदिर मुद्द्याला हवा देण्याचा प्रयत्नही झाला. मात्र मोदींनी लखनौला भेट दिल्यानंतर भाजपाने अचानक आपले डावपेच बदलविले असून दलित अजेंडा जवळ केला आहे.संघाकडून हिरव्या झेंड्याची प्रतीक्षा...मोदींनी इराणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असले तरी, रा.स्व. संघाकडून त्यांच्या नावाला हिरवा झेंडा दिला जाण्याची प्रतीक्षा आहे. नोव्हेंबरमध्ये भाजपाकडून इराणी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता पाहता, मुख्यमंत्रिपदासाठी दावेदारांच्या शर्यतीत सहभागी नेत्यांना शांत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्या यांना केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय कळविण्यात आला आहे.