लखनौ -उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे (एसपी) अध्यक्ष अखिलेश यादव, कोरोना लशीवर प्रश्न उपस्थित करून स्वतःच अडकले आहेत. यानंतर, भाजपने हाच मुद्दा उचलत, हा डॉक्टरांच आपमान असून अखिलेश यांनी माफी मांगावी, असे म्हटले आहे. यानंतर आता, अखिलेश यांनीही आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत सारवासारव केली आहे.
आपल्या वक्तव्यावर स्पष्टिकरण देताना अखिलेश म्हणाले, त्यांना वैज्ञानिकांवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, भाजप सरकारच्या वैद्यकीय यंत्रणेवर विश्वास नाही. तसेच पल्या वक्तव्याचा पुनरुच्चार करत, एसपी सरकार सर्वांना मोफ्त कोरोना लस देईल, असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी एका पत्रकार परिषदेत बोलताना, अखिलेश यादव म्हणाले की, जे सरकार टाळ्या आणि थाळ्या वाजवत होते तेच सरकार आता लसीकरणासाठी मोठी साखळी का तयार करत आहे. टाळ्या आणि थाळ्या वाजवूनच कोरोनाला का पळवून लावत नाहीत. मी सध्यातरी कोरोनावरील लस घेणार नाही. माझा भाजपाच्या लसीवर विश्वास नाही. जेव्हा आमचे सरकार बनेल तेव्हा सर्वांना मोफत लस देऊ, आम्ही भाजपाची लस घेऊ शकणार नाही.
यावेळी अयोध्येतील आलेले साधू संत, मौलाना आणि शीख समुदायाच्या लोकांना अखिलेश यादव यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर अखिलेश यादव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, गंगा-जमुनी तहजीब एका दिवसात विकसित झालेली नाही. ती विकसित व्हायला हजारो वर्षे लागली आहेत. मी धार्मिक माणूस आहे. माझ्या घरात मंदिर आहे. माझ्या घराबाहेरही मंदिर आहे. भगवान राम सर्वांचे आहेत. संपूर्ण जगाचे आहेत.