ज्ञानवापी-श्रृंगार गौरी खटल्याचा निकाल येण्यापूर्वी वाराणसी न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. गुरुवारी (२९ सप्टेंबर) मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी यासंदर्भात धमकीचा फोन आला होता. मध्यरात्री ५ कालिदास मार्गावरील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कर्तव्यावर असलेल्या एका कर्मचाऱ्यांने हा फोन उचलला होता. यावेळी संबंधित कर्मचाऱ्याने तू कुठून बोलत आहेस, असे विचारले असता. कॉल करणाऱ्याने कॉल कट केला. यासंदर्भात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. यानंतर सायबर टीम सक्रिय झाली.
यासंदर्भात लखनौ पोलिसांनी वाराणसी पोलिसांनाही माहिती दिली आहे. यानंतर, वाराणसी पोलिसांनी न्यायालयाची सुरक्षितताही वाढविली आहे. घटनेचा तपास करताना मोबाईल क्रमांक ट्रेस करताना सायबर टीम वाराणसीतील एका भाजी विक्रेत्यापर्यंत पोहोचली. यानंतर ताब्यात घेतलेल्या भाजी विक्रेत्याची चौकशी केली असती, त्याने आपला मोबाईल चोरीला गेल्याचे सांगितले. ज्या क्रमांकावरून कॉल आला तो क्रमांक भाजी विक्रेत्याच्या मुलीच्या नावावर आहे.
शिवलिंगाची एएसआयकडून तपासणी करण्याची मागणी -ज्ञानवापी-श्रृंगार गौरी खटल्यात 22 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्यासह इतरांनी शिवलिंगाच्या आकृतीची एएसआई (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण) तज्ज्ञांकडून कार्बन डेटिंग करण्याची मागणी न्यायालयात केली होती. यानंतर 29 सप्टेंबरला प्रकरणाची सुनावणी झाली.
निकालापूर्वी मिळाली धमकी - सुनावणीदरम्यान मुस्लीम पक्षानेही न्यायालयात आपली बाजू मांडली. शिवलिंगाची कार्बन डेटिंग होऊ नये. कारण हे शिवलिंग नसून फवारा आहे, असे मुस्लीम पक्षाने म्हटले आहे. दोन्ही पक्षांचे ऐकल्यानंतर, न्यायालयाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला आहे. यासंदर्भात न्यायालय सात ऑक्टोबरला आपला निर्णय सुनावणार आहे. असे असतानाच, वाराणसी न्यायालयाला बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली आहे. विशेष म्हणजे, अशी धमकी देणारा फोन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आला आहे.