प्रयागराज: आजकाल जवळजवळ प्रत्येकजण सोशल मीडिया साइट्सचा वापर करत आहे. सोशल मीडिया साइट्सवर फेक अकाउंट तयार करुन चुकीची कामे केली जातात. पण, पोलिसांनी फेक आयडीचा वापर करुन एका अपह्रणकरत्याला पकडल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.
प्रयागराज पोलिसांनी फेक अकाउंट वापरुन एका मोठ्या प्रकरणाची उकल केली आहे. प्रयागराजमधील एक तरुण तरुणीचे अपहरण करुन मुंबईला पळून गेला होता. त्या दोघांचे मोबाईलही बंद असल्याने त्यांचे लोकेशन ट्रेस करणेही अवघड झाले होते. मात्र पोलिसांनी तरुणीचा फेक फेसबुक आयडी तयार करुन आरोपी तरुणाला आपल्या जाळ्यात अडकवले. यानंतर फेसबुक आयडीवरुन आरोपी तरुणाला अटक करण्यात आली, तसेच अपहृत तरुणीही परत मिळवण्यात आली.
आरोपी फेसबुकच्या जाळ्यात
शहरातील यमुनापार परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाने घूरपूर पोलिस ठाण्यात आपल्या मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी सुरजीतचा शोध सुरू केला, तेव्हा तो मुंबईत राहत असल्याची माहिती मिळाली. बंद असलेला मोबाईल हाच आरोपीचा शोध घेण्याचा मार्ग होता. दरम्यान, पोलिसांना एका गोष्टीची माहिती मिळाली की, आरोपी तरुण फेसबुक साइटवर खूप सक्रिय आहे.
ट्रेनी IPS ने लढवली शक्कलयानंतर ट्रेनी IPS चिराग जैन याने तरुणीचा फेक फेसबुक आयडी तयार करून आरोपी तरुणाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तरुणाने ती रिक्वेस्ट स्वीकारली चॅटींग सुरू केली. फेसबुकवरील संभाषणात तरुणाकडून फोन नंबर मिळवला. त्या नंबरच्या आधारे त्याला ट्रेस करून अटक करण्यात आली. एवढेच नाही तर प्रयागराज घूरपूर येथील रहिवासी असलेल्या अपहृत मुलीचीही सुटका करण्यात आली.सध्या प्रयागराजमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.