बाबतपूर: परदेशातून सोन्याची तस्करी करण्यासाठी तस्कर विविध शक्कल लढवतात. यातील बहुतांश तस्कर विमानतळावर पकडले जातात. असाच एक तस्कर लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ पकडला गेला. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शारजाहून आलेल्या तस्कराकडून 840 ग्रॅम सोने जप्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कन्हैया कुमार असे या तस्कराचे नाव असून, तो शारजाहून भारतात दाखल झाला होता. त्याने चक्क आपल्या गुदाशयात(प्रायव्हेट पार्ट) सोने लपवले होते. या सोन्याची किंमत अंदाजे 49 लाख रुपये आहे. कन्हैया कुमार बिहारच्या सिवान जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो एअर इंडियाच्या फ्लाइट I-X 184 ने बुधवारी रात्री 11 वाजता वाराणसी विमानतळावर दाखल झाला. कस्टमच्या पथकाला त्याच्यावर संशय आला आणि त्यांनी कन्हैयाची चौकशी केली.
कसून चौकशी केल्यानंतर त्याने सोने लपवल्याची कबुली दिली. चौकशीदरम्यान कन्हैयाने गुदाशयात सोने लपवल्याचे सांगितले. यानंतर विमानतळावरील डॉक्टरांनी त्याच्या शरीरातून सोन्याची कॅप्सूल काढली. कन्हैयाची चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. नियमानुसार सोन्याची किंमत 50 लाखांपेक्षा जास्त असेल, तेव्हाच आरोपीला अटक केली जाते.
विशेष म्हणजे सीमाशुल्क विभागाच्या करड्या नजरेमुळे महिनाभरात कोट्यवधींचे सोने जप्त झाले आहे. महिनाभरात सहाव्यांदा सीमा शुल्क विभागाच्या पथकाने बाबतपूर विमानतळावर शारजाहून आणलेले सोने जप्त केले आहे. यात गुदाशयात सोने लपवण्याची प्रकरणे वाढली आहेत.