नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील कुख्यात गँगस्टर विकास दुबे (Vikas Dubey) याच्या पत्नीने पत्रकार परिषद घेऊन योगी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप विकास दुबेची पत्नी रिचा दुबेने (Richa Dubey) केला आहे. आमचं कुटुंब इकडे तिकडे भटकत आहे. पण सुनावणी होत नसल्याचंही रिचाने म्हटलं आहे. कानपूरमध्ये बिकरू भागात आठ पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केल्याचा आरोप विकास दुबेवर होता. या हत्याकांडानंतर पोलिसांनी केलेल्या एका एन्काऊंटरमध्ये विकास दुबे मारला गेला होता.
विकास दुबेची पत्नी रिचा दुबेने दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला खूप वाईट पद्धतीने छळलं जात आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला माघार घेण्यास प्रवृत्त केलं जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही गोष्ट स्वतःवर घेतली असून ते आम्हाला त्रास देत आहेत. आजपर्यंत मला माझ्या नवऱ्याच्या मृत्यूचा दाखला देखील मिळालेला नाही. कोणाला विचारलं तर सांगतात की हे प्रकरण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं आहे. सुनावणी होत नाही. आम्ही दवाखान्यापासून पोस्टमार्टम हाऊसपर्यंत सगळीकडे नुसत्या चकरा मारतोय.
"भाजपाचे लोक आमच्या जमिनी आणि शेती बळकावताहेत"
माझे वयोवृद्ध सासू सासरेही न्यायाच्या प्रतिक्षेत इथे-तिथे भटकत आहे. माझ्या दिराची मुलं शिकू शकत नाही. आमच्याकडे जगण्यासाठी आता कोणतंच साधन शिल्लक नाही असंही रिचा दुबेने पुढे सांगितलं. तसेच आमच्या जमिनी बळकावल्या जात आहेत, शेतीवर कब्जा केला. भाजपाचे लोक आमच्या जमिनी आणि शेती बळकावत आहे. राजू वाजपेयी नावाच्या एका व्यक्तीने आपली जमीन लाटल्याचा आरोपही रिचा दुबेने केला आहे.
"आता जगणं मुश्किल होऊन बसलं आहे"
शासन, प्रशासन कोणीही आमचं ऐकून घ्यायला तयार नाही. परिस्थिती तर अशी आहे की शेतात धान्य तर आहे, पण ते विकलंच जात नाही. कारण काय तर हे पीक विकास दुबेच्या शेतातलं आहे. आम्हाला यामुळे आता जगणं मुश्किल होऊन बसलं आहे, लोक घरी धमकी देण्यासाठी येतात. त्यामुळे तीन चार महिने बाहेरच राहावं लागत आहे असं विकास दुबेच्या पत्नीने सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.