लखनौ :उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये कोरोना लस घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका वॉर्ड बॉयचा मृत्यू झाला आहे. महिपाल (४६) असे त्यांचे नाव आहे. १६ जानेवारी रोजी त्यांनी ही लस घेतली होती. रविवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालयाच्या सीएमओंनी म्हटले आहे की, या प्रकरणात लसीची रिॲक्शन झाल्याचे दिसून येत नाही. त्यांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. १५ राज्यात कोरोनाचा एकही मृत्यू नाही देशातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ कोटी २ लाखांवर पोहचली आहे. गत २४ तासात १५ राज्यात कोरोनाचा एकही मृत्यू नाही. १३ राज्यात १ ते ५ मृत्यू आहेत. तर, ४ राज्यात ५ ते १० मृत्यू आहेत. एका राज्यात १० ते २० मृत्यू आहेत.आठ महिन्यांनंतर सर्वात कमी मृत्यू देशात या महिन्यात दुसऱ्यांदा २४ तासात एक हजारपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. देशातील एकूण रुग्णांची संख्या वाढून १ कोटी ५ लाख ७१ हजारांवर पोहोचली आहे. एका दिवसात १४५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, गत आठ महिन्यांतील ही सर्वांत कमी संख्या आहे. देशात एका दिवसात १३,७८८ नवे रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी १२ जानेवारी रोजी १२,५४८ रुग्ण आढळले होते. १४५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून १,५२,४१९ झाली आहे.
लस घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी वॉर्डबॉयचा मृत्यू, उत्तर प्रदेशातील घटना; प्रकरणाची चौकशी झाली सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 2:23 AM