लखनौ - वसीम रिझवी (Wasim Rizvi) ऊर्फ जितेंद्र त्यागी (Jitendra Tyagi) यानी तुरुंगातून पत्नी फरहा फातिमा यांच्या जीवाला जिहादींकडून धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. याच बरोबर, यात मौलानांसह यूपी पोलिसातील एका एसआयदेखील सामील असल्याचा आरोप जितेंद्र त्यागी यांनी केला आहे. जितेंद्र त्यागी यांच्या ट्विटर हँडलवरून लखनौ येथे राहणारी त्यांची पत्नी फरहा फातिमा यांचा जीव वाचविण्याची विनंती करण्यात आली आहे. याशिवाय, जितेंद्र त्यागी यांनी जनतेकडे न्यायासाठीही आवाहन केले आहे. वसीम रिझवी उर्फ जितेंद्र त्यागी सध्या हरिद्वार येथील धर्म संसदेत द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. याप्रकरणी पत्नी फरहा यांनीही पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप केला आहे.
जितेंद्र त्यागी यांनी लिहिले आहे, मी तुरुंगात आहे, तर मौलानांनी माझ्या पत्नीला मारहाण करून घराबाहेर काढले आहे. यूपी पोलिसांतील मुस्लीम एसआय जैदी देखील मौलानांना मदत करत आहे. आपण माझ्या कुटुंबाला आधार द्यावा, अशी विनंती जितेंद्र त्यागी यांनी जनतेला केली आहे. जिहादी माझी पत्नी फरहा फातिमाची हत्याही करू शकतात. ते माझ्या कुटुंबाला घाबरवत आहेत. मी तुरुंगात आहे. आपणच न्याय करा.
एसआयवर गंभीर आरोप - वसीम रिझवी उर्फ जितेंद्र त्यागी यांची पत्नी फरहा यांनी लखनौच्या सहदतगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यात त्यांनी आरोप केला आहे की, माझ्या घरात काही काम सुरू होते. ते थांबवण्यासाठी काही शेजारी आले. त्यांनी घरात घुसून असभ्य वर्तन केले, शिवीगाळ केली. यानंतर पोलिसांना कळवले असता, घटनास्थळी आलेले एसआय केवळ शांतपणे सर्व पाहत होते. यानंतर त्यांनी चावी हिसकावून घेत आपल्याच कुटुंबाला घराबाहेर फेकले.