नवी दिल्ली - स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अनेकदा रात्रीच्या वेळी लोक फोन चार्ज होत असतानाच वापरतात आणि झोपताना चार्जिंगवर ठेवतात, जाणे करून तो सकाळी पूर्णपणे चार्ज असावा. पण यामुळे मोठा अपघातही होऊ शकतो. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये घडली आहे. सहारनपूर जिल्ह्यात मोबाईल चार्ज करताना विजेचा धक्का लागल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिची दोन मुले होरपळली आहेत.
मोबाईल चार्ज करताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू -एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. पोलीस अधीक्षक अतुल शर्मा यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कुंडा गावात राहणारा शहजाद हा गंगोह येथील मोहल्ला इलाहीबख्श येथे आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतो. त्यांनी सांगितले की, मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री त्यांची पत्नी शहजादी आणि त्यांची दोन मुले कॉटवर पडून मोबाईल बघत होते, यावेळी मोबाईल चार्ज होत होता. शर्मा यांनी सांगितले की, झोप आल्याने शहजादी झोपी गेली. यानंतर, रात्री उशिरा मोबाईल अथवा चार्जरमध्ये करंट आल्याने हा अपघात घडला असावा.
आरडा-ओरड ऐकूण पतीला आली जाग अन्...शर्मा यांनी सांगितले की, या तिघांचा आरडा-ओरड ऐकूण शहजादला जाग आली. तोवर त्याची पत्नी आणि दोन्ही मुले बेशुद्ध झाले होते. यानंतर, तिघांनाही रात्री प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी शहजादीला मृत घोषित केले. तर तिची दोन मुले, आरिस (5-वर्ष) आणि सना (8-वर्ष) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रात्रभर मोबाईल चार्ज करणं धोक्याचं -आपणही रात्रभर मोबाईल चार्ज करत असाल, तर हे तत्काळ थांबवा. कारण यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी खराब होऊ शकते. अनेकदा लोक रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावून सोडून देतात. मात्र, यामुळे अनेक वेळा मोबाईलचा स्फोट झाल्याचे दिसून आले आहे. रात्रभर चार्जिंगमुळे मोबाईलचा स्फोट होण्याचीही भीती असते. ओव्हर चार्जिंग मोबाईलसाठी नेहमीच धोकादायक असते. यामुळे बॅटरीची लाइफदेखील कमी होते.