आग्रा: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं टोक गाठलं असताना देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर मिळावा यासाठी त्यांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू होती. त्यावेळी उत्तर प्रदेशातील एका महिलेचा फोटो व्हायरल झाला होता. पतीचा जीव वाचवण्यासाठी महिला त्याला तोंडानं श्वास देत होती. चार रुग्णालयांनी बेड नसल्याचं सांगून पतीला दाखल करुन घेण्यासा नकार दिला. त्याचा श्वास सुरू राहावा यासाठी महिलेनं शेवटपर्यंत प्रयत्न केले. एका रिक्षात बसून अत्यवस्थ पतीला तोंडानं श्वास देणारी पत्नी पाहून संपूर्ण देश हळहळला.
सोशल मीडियावर गेल्या महिन्यात व्हायरल झालेल्या महिलेच्या दुर्दैवाचे दशावतार संपलेले नाहीत. उत्तर प्रदेशातल्या आग्र्यात राहणाऱ्या त्या महिलेचं नाव रेणू सिंघल आहे. गेल्याच महिन्यात पती रवी सिंघल यांचं निधन झाल्यानं कुटुंबाची जबाबदारी आता रेणूंवर आहे. त्या आग्र्यात मुलीसह आवास विकास कॉलनीत एका लहानशा घरात वास्तव्यास आहेत. त्यांना महिन्याला अडीच हजार रुपये भाडं भरावं लागतं.भयानक! दहा दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नाही; जिवंतपणी आईसह पाच मुलांचा झाला सांगाडा
'माझी मुलगी भूमी १६ वर्षांची आहे. ती आता दहावीला आहे. माझे पती घरातले एकमेव कमावते होते. आमच्याकडे रेशन कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड नाही. लॉकडाऊन असल्यानं नोकरीही मिळत नाही. त्यामुळे परिस्थिती अतिशय बिकट आहे,' अशी व्यथा रेणू यांनी मांडली. रेणू यांचे पती रवी ४७ वर्षांचे होते. पेठे विकून ते कुटुंबाचं पोट भरायचे. लॉकडाऊनमध्ये उत्पन्न बंद झालं. थोड्याच दिवसात बचत केलेले पैसेदेखील संपले. 'मुलीचं पोट भरण्यासाठी मी नोकरी शोधत आहे. पण नोकरीच मिळत नाही. हाताला काम नसल्यानं परिस्थिती अतिशय वाईट आहे. मला माझ्या मुलीची चिंता वाटते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आम्हाला मदत करावी,' असं आवाहन रेणू यांनी केलं.