लखनऊ : श्रावणमासाच्या निमित्ताने कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेतील भाविकांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, कावड यात्रेकरुंवर हेलिकॉप्टरने फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पूर्णपणे तयारी केली आहे.
याचबरोबर, केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले आहे की, या कावड यात्रेदरम्यान ठिकठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते विविध ठिकाणी स्टॉल उभारुन कावड यात्रेत सामील होणाऱ्यांचे स्वागत करणार आहेत. तसेच, या यात्रेतील भाविकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
उत्तर प्रदेशच्या भाजपा प्रदेशाध्यपदी स्वतंत्र देव सिंह यांची नियुक्ती झाल्याबद्दल केशव प्रसाद मौर्य यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, ते म्हणाले, 'स्वतंत्र देव सिंह यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा राज्यात उरलेल्या वीस टक्के भागात सुद्धा कमळ फुलवण्यात यश मिळवेल.' दरम्यान, याआधी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी कुंभमेळ्यातील भाविकांवर सरकारने फुलांचा वर्षाव केला होता.