लखनै - उत्तर प्रदेशात पूर्ण बहुमताने सत्तेत परतलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) पूर्णपणे सक्रीय झाले आहेत. जनतेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या बैठकांमध्ये दिला आहे. यातच, उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा शहरांची नावे बदलण्याची तयारीही सुरू झाली आहे. या 12 शहरांपैकी 6 जिल्ह्यांची नावे सर्वप्रथम बदलली जाणार आहेत.
सर्वात पहिले या शहरांचा नंबर - 'इंडिया डॉट कॉम'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या यादीत अलीगढ, फारुखाबाद, सुलतानपूर, बदायूं, फिरोजाबाद आणि शाहजहानपूरच्या नावांचा समावेश आहे. अलीगडचे नाव बदलण्यासाठी, गेल्या वर्षी 6 ऑगस्ट 2021 रोजी, पंचायत समितीने नवे अध्यक्ष विजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली, नाव बदलासह नव्या नावाचा ठरावही मंजूर केला होता. आता या जिल्ह्याचे नाव हरिगड किंवा आर्यगड ठेवण्याची तयारी सुरू आहे.
याच वेळी फर्रुखाबाद जिल्ह्यातून सलग दुसऱ्यांदा खासदार झालेले मुकेश राजपूत यांनी नुकतेच फारुखाबादचे नाव बदलून पांचाल नगर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून हा जिल्हा द्रौपदीचे वडील द्रुपद पांचाल यांच्या राज्याची राजधानी असल्याचे म्हटले आहे. म्हणूनच त्याचे नाव पांचाल नगर असावे.
तसेच, सुलतानपूरच्या लंभुआ मतदारसंघातील भाजपचे आमदार देवमणी द्विवेदी यांनी जिल्ह्याचे नाव बदलून 'कुशभवनपूर' करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. शहाजहांपूरचे आमदार असलेले मानवेंद्र सिंह यांनी जिल्ह्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव योगी सरकारकडे पाठवला आहे. त्यांनी शहाजहांपूरचे नाव बदलून 'शाजीपूर'करण्यात यावे, असे सुचवले आहे. 2 ऑगस्ट 2021 रोजी फिरोजाबाद येथे झालेल्या सभेत जिल्ह्याचे नाव बदलून चंद्रनगर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, बदायूंचे नाव बदलण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नसला तरी, या जिल्ह्याचे नावही मुख्यमंत्री योगींच्या यादीत आहे.
या जिल्यांमध्येही तयार होतायत प्रस्ताव - - आग्रा- आंबेडकर विद्यापीठात आग्राऐवजी अग्रवण जिल्ह्याच्या नव्या नावाच्या बाजूने पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.- मैनपुरी- मैनपुरीमध्ये 16 ऑगस्ट रोजी जिल्हा पंचायत स्तरावरील बैठकीनंतर नाव बदलून मयान पुरी करण्याची मागणी करण्यात आली आहे.- गाझीपूर- येथील ज्येष्ठ नेते कृष्णानंद राय यांच्या पत्नी अलका राय यांनी वर्षभरापूर्वीच गाझीपूरचे नाव बदलून गाढीपुरी करण्याची मागणी केली होती.- कानपूर- कानपूर ग्रामीणमधील रसुलाबाद आणि सिकंदराबाद आणि अकबरपूर राणी येथील नावांसंदर्भात प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.- संभल- जिल्ह्याचे नाव कल्कि नगर अथवा पृथ्वीराज नगर करण्याची मागणी होत आहे.- देवबंद- भाजप आमदार ब्रजेश सिंह रावत यांनीही देवबंदचे नाव देववृंदपूर करण्याची मागणी केली आहे.