लखनऊः वाढदिवस साजरा करण्याच्या प्रत्येकाच्या निरनिराळ्या तऱ्हा असतात. काही जण मित्रमैत्रिणींसमवेत वाढदिवस साजरा करण्याला प्राधान्य देतात. तर काहींना भररस्त्यात केक कापून बर्थ डे साजरा करण्यास आवडते. अशाच प्रकारचा रस्त्यावर वाढदिवस साजरा करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये वाढदिवस साजरा करणारी व्यक्तीनं सुरीनं नव्हे, तर बंदुकीच्या गोळीनं केक कापल्याचं पाहायला मिळतंय.हा व्हिडीओ प्रथमदर्शी उत्तर प्रदेशमधला असल्याचं दिसतंय. या व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. त्या मुलानं जन्मदिवसाचा केक सुरीनं नव्हे, तर बंदुकीची गोळी चालवून कापला आहे. केकवर मेणबत्तीही लावली होती. जिला बंदुकीच्या गोळीनं विझवण्यात आलं. सोशल मीडियावरून या व्हिडीओवर खूप टीका होत आहे. रस्त्यावर खुलेआम अशा पद्धतीनं बंदुकीच्या गोळीनं केक कापल्यामुळे उत्तर प्रदेशमधल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. उत्तर प्रदेशचे पोलीसही त्या बंदुकधाऱ्याचा आता शोध घेत आहेत. ट्विटरवर पीयूष राय नावाच्या व्यक्तीनं हा व्हिडीओ शेअर केला असून, हा व्हिडीओ उत्तर प्रदेशचत्या मेरठमधला असल्याचं सांगितलं जातंय. हा व्हिडीओ टिकटॉकचा दिसतोय. टिक-टॉकवर ज्या युजर्सनं हा व्हिडीओ शेअर केला आहे, त्यावर मेरठचा पत्ता दाखवण्यात आला आहे.या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेली व्यक्ती भर रस्त्यावर हातात बंदूक घेऊन पाहायला मिळतेय आणि केकला दूर ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर एका व्यक्तीनं त्या केकवर बंदुकीतून गोळी झाडली आहे. इतर लोक त्याला प्रोत्साहन देत होते. केकवर गुर्जर असं लिहिलं आहे. 20 मिनिटांचा हा व्हिडीओ पाहून उत्तर प्रदेशचे पोलीसही अचंबित झाले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी मेरठ पोलिसांना याची सूचना दिली. परंतु मेरठ पोलिसांनी हा आमच्या भागातील व्हिडीओ नसल्याचं सांगितलं. त्यामुळे उत्तर प्रदेशचे पोलीस आता त्या व्हिडीओतील मुलांचा शोध घेत आहेत.
'त्याने' सुरीने नव्हे, चक्क बंदुकीच्या गोळीने कापला केक; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 4:43 PM