ऑनलाइन लोकमतआझमगड, दि. 22 - उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळ्या शब्दांतून चिखलफेक करण्यात येत असते. स्मशान, कब्रिस्तान, गाढव यांसारख्या शब्दांचा प्रयोग केल्यानंतर आता कसाब नावाचा टीका करण्यासाठी वापर करण्यात आला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या रॅलीला संबोधित करताना विरोधकांची तुलना कसाबशी केली आहे. कसाब हा पाकिस्तानमधील एक दहशतवादी होता. ज्याला मुंबईतल्या 26/11 या दहशतवादी हल्ल्यात दोषी ठरवून फाशी देण्यात आली होती. मात्र आज अमित शाह यांनी आझमगड येथे रॅलीला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, कसाब या शब्दाची फोडणी करताना ते म्हणाले की, क म्हणजे काँग्रेस, स म्हणजे समाजवादी पार्टी आणि ब म्हणजे बहुजन समाज पार्टी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तर प्रदेशचा विकास हा या कसाबमुळेच थांबला आहे. या कसाबला उत्तर प्रदेशमधून बाहेर हाकलून द्या, असंही अमित शाह म्हणाले आहेत. त्यानंतर काँग्रेसनं अमित शाहांवर पलटवार केला आहे. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, या वक्तव्यातून भाजपाची मानसिकता दाखवते. तत्पूर्वी मायावतींनी नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली होती.