धनाजी कांबळेलाेकमत न्यूज नेटवर्कजौनपूर : उत्तर प्रदेश, बिहार राज्यात गरिबी असली तरी शिक्षण हा इथल्या शोषित समूहांच्या विकासाचं महत्त्वाचं माध्यम आहे. पूर्वांचलमधील जौनपूर जिल्ह्यातील माधवपट्टी गावात ७० ते ८० घरे असतील, पण ५० हून अधिक आयएएस आणि आयपीएस आहेत.
येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक असलेले वीरेंद्र कुमार सिंग सांगतात, कवी वमीक जोनपुरी यांचे वडील मुस्तफा हुसेन हे गावातील पहिले आयएएस अधिकारी होते. १९१४ मध्ये त्यांनी यूपीएससीसारखीच सर्वोच्च परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्यानंतर १९५१ मध्ये इंदू प्रकाश यांनी प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवला आणि आयएएस अधिकारी बनले. ते जवळजवळ १६ देशांचे राजदूतही होते. त्यांचे भाऊ विद्या प्रकाश सिंह हे देखील १९५३ मध्ये आयएएस अधिकारी बनले. ते यूपीएससीचे काही काळ अध्यक्षही होते. तेव्हापासून ही गावाची परंपरा कायम आहे.
गावचे माजी सरपंच दिलीपकुमार सिंग म्हणाले, गावात काही कार्यक्रम असेल तेव्हा प्रत्येक गल्लीत लाल-निळ्या दिव्याच्या गाड्या दिसतात. साधारण ७००-८०० लोकसंख्या असलेल्या या गावात राजपूत लोकांची संख्या जास्त आहे. गावाच्या सुरुवातीलाच एक मोठं प्रवेशद्वार आहे, तेच या गावाचे वेगळेपण दर्शवते. विशेष म्हणजे या गावात कोणतीही प्रशिक्षण संस्था नाही; तरीही मेहनतीने इथले तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करतात.
माधवपट्टी, गोधना, निवाना, शिवपूर, कुडवा, परियावा, मई अशी आजूबाजूची १२ गावे अशी आहेत, जिथे प्रत्येक घरातील एक तरी सरकारी नोकरीत आहे. माध्यमिक शाळेत असतानाच मुलांमध्ये यूपीएससी तयारी करण्याची मानसिकता तयार होते. माधवपट्टीत ५ आयपीएस, १२ आयएएस आणि ३६ जण राज्य सेवा आयोगाकडून (पीसीएस) अधिकारी झाले आहेत. यात ११ महिलांचा समावेश आहे. बुद्धिजीवी गाव असल्याने गावात चोरी, भांडणतंटे होत नाहीत, असे ध्यानचंद सिंग यांनी सांगितले.
एकाच घरातील चार भाऊ आयएएस या गावातील एकाच घरातील चार जण आयएएस झाले आहेत. १९५५ मध्ये कुटुंबातील मोठे असलेले विनय सिंह परीक्षा पास झाले. निवृत्तीच्या काळात ते बिहारचे मुख्य सचिव होते. त्यांचे भाऊ छत्रपाल सिंह आणि अजयकुमार सिंह १९६४ मध्ये आयएएस झाले. आणि सर्वात लहान शशिकांत सिंह १९६८ मध्ये आयएएस झाले. २००२ मध्ये शशिकांत यांच्या मुलाने देखील आयएएस परीक्षा क्रॅक केली.
...गावात सपा फिरकलीच नाहीमाधवपट्टी गावात प्रचारासाठी सगळेच पक्ष येतात, पण या गावात ठाकूर राजपूत समाजाचे लोक जास्त असल्यामुळे अखिलेश यादव यांच्या पक्षाचे लोक इकडे प्रचाराला येत नाहीत. मात्र, आमच्यासाठी सगळे पक्ष सारखेच आहेत, सर्वांनी प्रचाराला यावे, असे राहुल सिंग यांनी सांगितले.