ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - निवडणूक आयोगाने बुधवारी उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 4 मार्चपासून या निवडणुकांना सुरुवात होत आहे. तर 11 मार्च रोजी एकाच दिवशी सर्व राज्यांची मतमोजणी पार पडणार आहे. यावेळी उत्तरप्रदेशमध्ये नेमकं कोण बाजी मारेल याची सर्वांना उत्सुकता असून लक्ष लागलं आहे.
पाचही राज्यांमधील एकूण 690 जागांसाठी निवडणूक होणार असून 16 कोटी मतदार यावेळी मतदानाचा हक्क बजावतील. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. पाचही राज्यांमध्ये ताबडतोब आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. पाचही राज्यांमधअये विधानसभा निवडणुकीसाठी 1.85 लाख मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत.
निवडणूक प्रचारासाठी रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊड स्पीकर वापरता येणार नाही. काळा पैसा, रोख व्यवहार आणि गैरप्रकारांवर कडक लक्ष ठेवण्यात येणार असल्याचेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. निवडणूक प्रचारासाठी प्लास्टिक सामुग्रीच्या वापराला बंदी घालण्यात आली आहे. शिवाय, उमेदवारावर पाणी, वीज किंवा कोणत्याही बिलाची थकबाकी नसावी,असेही निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
उत्तराखंड, पंजाब, उत्तराखंडातील उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा 28 लाख रुपये ठरवण्यात आली आहे. तर गोवा आणि मणिपूरमधील 20 लाख उमेदवारांना 20 हजार रुपयांवरील खर्चासाठी चेकचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. तसंच राजकारण्यांच्या मालकीच्या प्रसारमाध्यमांवर जाहिरातबाजी केली जात आहे का यावर निवडणूक आयोगाची नजर असणार आहे.
कोणत्या राज्यात किती तारखेला होणार मतदान -
- गोवा - 4 फेब्रुवारी (40 जागा)
- उत्तराखंड - 15 फेब्रुवारी (70 जागा)
- मणिपूर - 4 मार्च (पहिला टप्पा), 8 मार्च (दुसरा टप्पा) - (60 जागा)
- पंजाब - 4 फेब्रुवारी (117 जागा)
- उत्तरप्रदेशमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान - पहिला टप्पा - 11 फेब्रुवारी (73 जागा) , दुसरा टप्पा - 15 फेब्रुवारी (67 जागा). तिसरा टप्पा - 19 फेब्रुवारी (69 जागा), चौथा टप्पा - 23 फेब्रुवारी (53 जागा), पाचवा टप्पा - 27 फेब्रुवारी (52 जागा), सहावा टप्पा - 4 मार्च (49 जागा), सातवा टप्पा - 8 मार्च (40 जागा). - (एकूण 403 जागा)
कोणत्या राज्यात किती जागा -
- गोवा - (40)
- उत्तराखंड - (70)
- मणिपूर - (60)
- पंजाब - (117)
- उत्तरप्रदेश - (403)
गोवा सरकाराचा पाठिंबा काढून घेणार - म.गो.पक्ष
गोवा विधानसभा निवडणूक येत्या 4 फेब्रुवारी रोजी होत असताना दुसरीकडे गोव्यातील सत्ताधारी आघाडीचा घटक असलेल्या म.गो. पक्षाने गुरुवारी सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे स्पष्ट केले. 2012 सालापासून म.गो. पक्ष सत्तेत आहे. भाजपाकडे काठावरील बहुमत आहे, त्यामुळे सरकारच्या स्थिरतेस धोका नाही. यामुळे म.गो. व भाजपाची युती तुटल्यात जमा झाल्याचे बोलले जात आहे.