Uttara Kannada Accident : येल्लापूर : कर्नाटकमधील कारवार जिल्ह्यातील येल्लापूर महामार्गावर बुधवारी (दि.२२) ट्रकचा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, यल्लापूर महामार्गावर गुळापुर घाटात भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक ५० मीटर खोल दरीत कोसळला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात पहाटे चार वाजताच्या सुमारास झाला.
अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. तसेच, अपघातात मृत पावलेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, ट्रकमधील सर्वजण सावनुरमधून कमेठी येथील भाजीमंडईत जात होते. या ट्रकमधून २५ जण प्रवास करत होते. या अपघातात १५ जखमी झाले असून जखमींना हुबळीच्या किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
कारवार पोलीस अधीक्षक एम. नारायण यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, "पहाटे ४ वाजताच्या सुमारास ट्रक चालक दुसऱ्या वाहनाला साइड देताना डाव्या बाजूला वळला आणि जवळपास ५० मीटर खोल दरीत पडला. घाटातील या रस्त्यावर सुरक्षा भिंत नाही. या अपघातात १० जणांचा जागीच मृत्यू झाला आणि १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे."