नवी दिल्ली: पुढच्याव वर्षी होणाऱ्या उत्तराखंड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपने मोठी घोषणा केली आहे. उत्तराखंडमधील हल्द्वानीच्या दौऱ्यावर असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी उत्तराखंडमध्ये सरकार आल्यास 6 महिन्यांत 1 लाख सरकारी नोकऱ्या आणि नोकरी मिळेपर्यंत दरमहा 5,000 रुपये भत्ता देण्याची घोषणा केली आहे.
हल्दवानी येथील पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधत म्हटले की, उत्तराखंडला 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. 21 वर्षांपासून या पक्षांनी उत्तराखंडची वाईठ परिस्थिती केली. डोंगर-जंगलं, नैसर्गिक संसाधने लुटून नेली. पण, या पक्षांनी 21 वर्षात जी वाईट परिस्थिती केली, ती आम्ही 21 महिन्यात सुधारू.
केजरीवाल पुढे म्हणाले की, उत्तराखंडसाठी आम्ही अनेक चांगल्या योजना आखत आहोत. यातील पहिली योजना आम्ही तुमच्यासमोर मांडली आहे. आमचे सरकार आल्यानंतर दिल्लीप्रमाणे आम्ही उत्तराखंडमध्येही 300 युनिट वीज मोफत करणार आहेत.याशिवाय, आतापर्यंत रोजगारासाठी उत्तराखंडच्या तरुणांना बाहेर राज्यात जावं लागत आहे, पण आमचे सरकार आल्यावर आम्ही राज्यात मोठा रोजगार निर्माण करू. राज्यातील सरकारी नोकऱ्यांमध्ये 80% नोकऱ्या उत्तराखंडच्या नागरिकांसाठी असतील, असंही ते म्हणाले.