नवी दिल्ली - उत्तराखंडच्या चंपावतमध्ये एका भीषण अपघात झाला आहे. लग्नसोहळ्यावरून परतणाऱ्या मंडळींवर काळाने घाता घातला आहे. लग्न आटपून घरी परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या जीपला मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जीप दरीत कोसळल्याने तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील टनकपूर-चंपावत महामार्गावरील सुखीढांग-डांडामीनार मार्गावर ही दुर्घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि ग्रामस्थांच्या मदतीने वेगाने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
मॅक्स या गाडीचा अपघात झाला आहे. या गाडीतून सर्व प्रवासी टनकपूर येथील पंचमुखी येथे लग्न सोहळा आटपून आपल्या घराकडे परतत होते. रात्री जवळपास 3-4 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. चालकाचं जीपवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 13 मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. अद्यापही घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे. जीप खोल दरीत कोसळल्याने मृतदेहांची ओळख पटवण्यातही अडचण येत आहे.
अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 13 जणांचे मृतदेह पोलिसांनी दरीतून बाहेर काढले आहेत. सर्व 13 जणांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. मृतकांमध्ये चार महिला, एक पाच वर्षांची मुलीचा समावेश आहे. या अपघातात गाडी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघातानंतर ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. पीएमओने ट्विट करत "उत्तराखंडमधील चंपावत येथे झालेला अपघात ह्रदयद्रावक आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. स्थानिक प्रशासन मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने करत आहेत" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.