Kedarnath Cloudburst : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला आहे. अशातच बुधवारी रात्री उशिरा उत्तराखंडच्याकेदारनाथमध्ये ढगफुटी झाल्याने परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. केदारनाथ परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे मंदाकिनी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ढगफुटीमुळे २ जणांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक पर्यटक अडकले असून त्यांची सुटका करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. या ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, केदारनाथमध्ये २०१३ साली झालेल्या ढगफुटीमुळे तब्बल ५०००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
मुसळधार पावसामुळे उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही राज्यांमध्ये अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. केदारनाथमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे उत्तराखंडमधील परिस्थिती चिंताजनक आहे. केदारनाथला जाणाऱ्या मार्गावर लिनचोलीजवळ ढगफुटीची घटना घडली. त्यामुळे काहीच क्षणात मंदाकिनी नदीची जलपातळी वाढली. यामुळे केदारनाथला जाणारी पदयात्रा विस्कळीत झाली आहे. पदयात्रेच्या मार्गावरच ढग फुटल्याने २०० तीर्थयात्रेकरू अडकल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तराखंडच्या टिहरी, रुद्रप्रयाग आणि भिंबलीमध्ये ढगफुटीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. विविध ठिकाणी यात्रेकरू मोठ्या संख्येने अडकून पडले आहेत. संपूर्ण उत्तराखंडमध्ये अलर्ट घोषित करण्यात आला आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, जिल्हा पोलीस आणि स्थानिक प्राधिकरणांसह आपत्कालीन पथकांना विविध ठिकाणी ढगफुटीची माहिती मिळाल्यानंतर हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत
पाऊस थांबत नसल्याने पाण्याची पातळीही वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी स्फोटक बनण्याची शक्यता आहे. सध्या प्रशासनाने शाळा बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद राहणार आहेत. याशिवाय, हवामान खात्याने उत्तराखंडमधील सात जिल्ह्यांमध्ये ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, हिमाचल प्रदेशातील शिमला येथील रामपूरजवळ ढगफुटीमुळे २०-२२ लोक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेले लोक वीज प्रकल्पातील कर्मचारी असू शकतात. दुसरीकडे संपूर्ण हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने संपूर्ण राज्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.