Uttarakhand: उत्तराखंडमधील चार धाम यात्रेत आतापर्यंत 39 भाविकांचा मृत्यू, समोर आले कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 11:30 AM2022-05-16T11:30:29+5:302022-05-16T11:30:42+5:30
यंदा उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रा सुरू होऊन केवळ 13 दिवस झाले आहेत.
डेहराडून:उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 39 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या महासंचालक डॉ. शैलजा भट्ट यांनी सांगितले की, या सर्व मृत्यूंची कारणे उच्च रक्तदाब, हृदयविकाराच्या समस्या आणि माउंटन सिकनेस (उंचीशी संबंधित समस्या) आहेत. यंदा उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रा सुरू होऊन केवळ 13 दिवस झाले आहेत, अशा स्थितीत एवढ्या मोठ्या संख्येने भाविकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य सेवेच्या सज्जतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
3 मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या सणापासून सुरू झालेल्या चार धाम यात्रेत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भाविकांच्या या मृत्यूची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आणि मंदिरांमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन प्रत्येक धाममध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या एक हजाराने वाढवली.
आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारही धामांमधील - 2700 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या यात्रेकरूंना अत्यंत थंडी, कमी आर्द्रता, अतिनील किरणे, कमी हवेचा दाब यांचा सामना करावा लागतो. यासोबत ऑक्सिजनची कमतरताही भासते. या सर्व गोष्टीमुळे वैद्यकीय तपासणीनंतरच प्रवास सुरू करावा, असा सल्ला सरकारकडून देण्यात येत आहे.
याशिवाय आधीच आजारी असलेल्यांना डॉक्टरांचा अहवाल, त्यांची औषधे आणि डॉक्टरांचा फोन नंबर सोबत ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच हृदयविकार, श्वसनाचे आजार, मधुमेह, उच्चरक्तदाब अशा रुग्णांनी उंच भागात जाताना विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार डोकेदुखी, चक्कर येणे, घबराट होणे, हृदयाचे ठोके जलद होणे, उलट्या होणे, हातपाय आणि ओठ निळे पडणे, थकवा येणे, धाप लागणे, खोकला किंवा इतर लक्षणे दिसल्यास तात्काळ उपचार करण्यास सांगितले आहे. यासाठी सरकारने 104 हा हेल्पलाइन क्रमांक काढला आहे.