नवी दिल्ली - देशात एकीकडे कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान घालायला सुरुवात केली असतानाच, दुसरीकडे देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब आणि गोवा या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची शनिवारी घोषणा करण्यात आली आहे. येथे एकूण ६९० विधानसभा जागांसाठी निवडणूक होईल. या राज्यांतील निवडणुका भविष्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही महत्वाच्या असल्याचे मानले जात आहे. उत्तराखंडमध्ये एकूण ७० जागांसाठी १४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होईल. तसेच १० मार्चला पाचही राज्यांची मतमोजणी होईल. यासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चिंद्रा यांनी माहिती दिली.
महत्वाचे म्हणजे, १५ जानेवारीपर्यंत रोड शो, पदयात्रा, सायकल किंवा बाईक रॅली आणि राजकीय सभांना परवानगी नसेल. यानंतर कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेत पुढील नियम जाहीर केले जातील, असेही निवडणुक आयोगाने म्हटले आहे.
या ५ राज्यांपैकी पंजाब वगळता ४ राज्यांमध्ये एनडीएचे सरकार आहे. यांपैकी उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ, उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी, गोव्यात प्रमोद सावंत, मणिपुरमध्ये नोगथोम्बन बीरेन सिंग आणि पंजाबमध्ये काँग्रेसचे चरणजीत सिंग चन्नी हे मुख्यमंत्री आहेत. या पाच राज्यांत तब्बल १८.३४ कोटी मतदान मतदान करतील.
उत्तराखंडमधील नविडणूक समिकरण -एकूण 70 जागा असलेल्या उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाळ 23 मार्च 2022 रोजी संपत आहे. मात्र, राज्यात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. येथे काँग्रेससह भाजप, आम आदमी पार्टी, बसपा आणि अनेक छोटे पक्ष आपले नशीब आजमावणार आहेत. तथापि, उत्तराखंडची निवडणूक भाजपसाठी सर्वात आव्हानात्मक आहे. कारण येथे गेल्या दोन दशकांपासून दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा आहे. अशा स्थितीत काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे. पण कांग्रेसला टक्कर देत भाजप सत्ता परिवर्तनाची परंपरा मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करेल.
उत्तराखंडमध्ये 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 57 जागा जिंकल्या आणि प्रचंड बहुमताने आपले सरकार स्थापन केले. तर काँग्रेसला केवळ 11 जागाच मिळाल्या होत्या. यानंतर त्रिवेंद्रसिंह रावत मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांना चार वर्षांनी हटवून भाजपने सत्तेची धुरा तीरथसिंह रावत यांच्याकडे सोपवली. मात्र काही महिन्यांतच तीरथ सिंह रावत यांच्या जागी पुष्कर सिंह धामी यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनवण्यात आले.