देहरादून: देवभूमी उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भारतीय जनता पक्षानं ताकद पणाला लावली आहे. तर काँग्रेसनं सत्ताबदलासाठी कंबर कसली आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या एकाच नेत्यानं भाजपसमोर आव्हान उभं केलं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी यांनी उत्तराखंडमध्ये फारशा सभा घेतलेल्या नाहीत. काँग्रेसनं रणनीती बदलल्यानं भाजपला आता केवळ एकाच नेत्यावर टीका करावी लागत आहे.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. मात्र तरीही पक्षानं ७० पैकी ५७ जागा जिंकल्या. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर भाजपनं निवडणूक लढवली. राज्यात काँग्रेस विरुद्ध भाजप सामना अपेक्षित होता. मात्र यंदा हरिश रावत विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री असलेल्या रावत यांनी भाजपला शिंगावर घेतलं आहे.
उत्तराखंडमध्ये २ दिवसांनंतर मतदान होणार आहे. पण काँग्रेसच्या हायकमांडनं राज्यात फारसं लक्ष घातलेलं नाही. संपूर्ण जबाबदारी एकट्या रावत यांच्याकडे आहे. गेल्या निवडणुकीत राहुल गांधींनी राज्यात ७ ते ८ रॅली केल्या होत्या. मात्र यंदा राहुल यांनी पाचच सभा घेतल्या आहेत. स्थानिक नेते, प्रदीर्घ अनुभव आणि लोकप्रियता यामुळे रावत यांनी भाजपसमोर आव्हान उभं केलं आहे.
उत्तराखंडमध्ये सध्या रावत विरुद्ध भाजप असा मुकाबला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचारसभा घेतली. त्यातही त्यांच्या निशाण्यावर रावतच होते. 'हरिश रावत मोठमोठी भाषणं देताहेत. आश्वासनं देताहेत. पण इथले तरुण अधिकारांसाठी संघर्ष करताना त्यांच्यावर गोळ्या कोणी झाडल्या?', असा सवाल शाह यांनी विचारला. रावत यांनी उत्तराखंडसाठी खूप केलं. आता भाजपच्या तरुण मुख्यमंत्र्याला संधी मिळायला हवी, असंही शाह म्हणाले. आतापर्यंत आलेल्या सर्वेक्षणांमध्येही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून रावत सर्वात पुढे आहेत.