नवी दिल्ली: उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षानं सत्ता राखली आहे. राज्यात विधानसभेच्या ७० जागा आहेत. त्यापैकी ४८ जागांवर भाजपनं आघाडी घेतली आहे. उत्तराखंडात भाजपसाठी गड आला, पण सिंह गेला अशा परिस्थिती आहे. कारण भाजपनं सत्ता राखली असली तरी विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना पराभव पत्करावा लागला आहे. खटिमा विधानसभा मतदारसंघात धामी यांचा ६ हजार मतांनी पराभव झाला आहे. काँग्रेस उमेदवार भुवन चंद्र कापडी यांनी धामी यांना पराभूत केलं आहे.
उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री असलेला नेता जिंकत नाही हे आतापर्यंत अनेकदा दिसून आलं आहे. केवळ एकच मुख्यमंत्री याला अपवाद राहिले, ते म्हणजे भगतसिंह कोश्यारी. सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले कोश्यारी २००१ ते २००२ या कालावधीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. २००२ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले कोश्यारी निवडून आले. इतर कोणत्याही मुख्यमंत्र्याला ही किमया साधता आलेली नाही.
उत्तराखंडच्या २१ वर्षांच्या राजकीय प्रवासात पाच विधानसभा निवडणुका झाल्या. दरवेळी सत्ताधारी पराभूत झाले आणि विरोधकांना संधी मिळाली. भाजपनं ६ महिन्यांपूर्वी दोनवेळा मुख्यमंत्री बदलले. पुष्कर सिंह धामी यांनी जुलै २०२१ मध्ये राज्याची सुत्रं हाती घेतली. त्यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपनं विधानसभा निवडणूक लढवली. सत्ताधारी पराभूत होण्याची परंपरा खंडित करण्यात धामी यांना यश आलं. पण धामी स्वत: पराभूत झाले.