देहरादून-
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येत आहे तसं प्रचाराला देखील रंग चढला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार एकापेक्षा एक शक्कल लढवताना दिसत आहेत. नुकतंच उत्तराखंडमधील तेहरी गरवाल जिल्ह्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला काँग्रेस उमेदवार लोकांच्या दारावर जाऊन भिकारी समजून तरी मतदान करा, अशी विनवणी करताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस उमेदवाराच्या या अनोख्या प्रचाराची संपूर्ण राज्यात चर्चा होत आहे.
तेरही गरवाल येथील घनसाली विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार धनीलाल शाह आपलं नशीब आजमावात आहेत. निवडणूक प्रचारात ते घरोघरी जाऊन मत देण्याचं आवाहन मतदारांना करत आहेत. भिक समजून मला मत द्या असं म्हणत धनीलाल शाह जनतेशी घरोघरी जाऊन बराच वेळ चर्चा देखील करत आहेत. "मला तुमच्यावर खूप विश्वास आहे की तुम्ही मला विधानसभेवर नक्की पाठवाल. तुम्ही जर मला मत देऊ शकत नसाल तर माझा पराभव झाल्यानंतर माझ्या पार्थिवावर एक-एक लाकूड नक्की टाकायला या", अशीही भावनिक साद धनीलाल शाह मतदारांना घालत आहेत.
उत्तराखंडमध्ये मतदान केव्हा?उत्तराखंड विधानसभेच्या ७० जागांसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी १० मार्च रोजी होणार आहे.
उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाळ २३ मार्च २०२२ रोजी संपुष्टात येत आहे. राज्यात काँग्रेस आणि भाजपासोबतच आम आदमी पक्ष, बसपा आणि इतर छोटे पक्ष आपलं नशीब आजमावत आहेत. विशेषत: भाजपासाठी उत्तराखंड निवडणूक सर्वाधिक आव्हानात्मक असणार आहे. कारण गेल्या दोन दशकांमध्ये दर पाच वर्षांनी उत्तराखंडमध्ये सत्ता बदलाची परंपरा चालत आली आहे. त्यामुळे काँग्रेसला यावेळी प्रचंड अपेक्षा आहेत.