Uttarakhand Avalanche, Mountaineers Trapped: उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे एक अतिशय मोठी घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे. उत्तरकाशीमध्ये बर्फाच्या वादळामुळे अनेक गिर्यारोहक अडकल्याचे वृत्त आहे. २३ सप्टेंबर रोजी नेहरू पर्वतारोहण संस्थेतील ४० गिर्यारोहकांची टीम उत्तरकाशीहून द्रौपदीच्या दांडा-2 पर्वत शिखरावर रवाना झाली होती. मंगळवारी येथेच हे सर्व जण हिमस्खलनात अडकले. नेहरू पर्वतारोहण संस्थेचे प्रिंसिपल कर्नल बिष्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ गिर्यारोहक वादळात अडकले असून त्यापैकी १० जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर हालांकि १८ गिर्यारोहक अद्यापही बेपत्ता आहेत.
अपघाताची माहिती मिळताच NIMच्या टीमसह जिल्हा प्रशासन, NDRF, SDRF, लष्करी जवान आणि ITBP चे जवान सक्रिय झाले असून वेगाने मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे.
"गिर्यारोहकांचा एक गट द्रौपदीच्या दांडा-2 पर्वत शिखरावर जाण्यासाठी निघाला होता. हे शिखर समुद्रसपाटीपासून तब्बल १८ हजार फूट वर आहे. हे लोक तेथे असतानाच सकाळी ८ वाजताच्या सुमारास बर्फाचे वादळ आले आणि २९ गिर्यारोहक तेथे अडकले. त्यापैकी ८ जणांना बाहेर काढण्यात आले आहे," असे ITBP चे जनसंपर्क अधिकारी विवेक पांडे म्हणाले होते.
"ITBP, NDRF, SDRF आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे मदत व बचावकार्य सुरू केले आहे. माहिती मिळताच आम्ही सारे तेथे पोहोचलो असून शक्य तितक्या जलदगतीने सर्वांना सुखरूप सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अडकलेल्या आणि जखमी गिर्यारोहकांना हेलिपॅडजवळ नेले जात असून तेथून हेलिकॉप्टरने त्यांना ITBP च्या रुग्णालयात दाखल केले जात आहे", अशी माहितीही त्यांनी दिली.