उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील माणा गावामध्ये आज सकाळी हिमकडा कोसळून मोठी दुर्घटना घडली असून, त्यात ५७ कामगार गाडले गेले होते. या कामगारांसाठी लष्कराचे जवान हे देवदूतासारखे धावून आले आहे. लष्कराच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करत बर्फाखाली अडकलेल्या ५७ कामगारांपैकी ३२ जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. तर २५ जणांचा शोध सुरू आहे.
उत्तराखंडमधील बद्रीनाथ धामपासून सुमारे ३ किमी पुढे असलेल्या माणा क्षेत्रामध्ये रस्ता बांधण्याचं काम सुरू होतं. याचदरम्यान, अचानक एक हिमकडा कोसळला आणि तिथे असलेले कामगार हे या बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडले. या घटनेमध्ये ५७ कामगार हे बर्फाखाली गाडले गेले होते. दरम्यान, परिस्थितीचं गांभीर्य ओळखून भारतीय लष्कराच्या आयबीइएक्स ब्रिगेडने मोर्चा सांभाळला. तसेच त्वरित बचाव कार्य सुरू केलं.
या जवानांनी सुमारे ३२ कामगारांना बर्फाखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवलं आहे. बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांपैकी १० कामगारांवर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच घटनास्थळावर आयटीबीपी आणि गढवाल रायफल्सचे जवान उपस्थित आहेत. तसेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, घटनास्थळावर मदतकार्य वेगाने सुरू आहे. मात्र प्रचंड हिमवृष्टी आणि खराब हवामानामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. प्रशासन आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची टीमही मदतकार्यात गुंतली आहे.