डेहरादून - गायीला 'राष्ट्रमाता' घोषित करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. उत्तराखंड विधानसभेमध्ये यासंबंधीचे विधेयक पारित करण्यात आले असून हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. उत्तराखंडच्या पशुपालन मंत्री रेखा आर्य यांनी हा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता. या प्रस्तावाबाबत आर्य यांनी म्हटले की, ''आपणा सर्वांना (सत्ताधारी आणि विरोधक) गायीचे महत्त्व माहिती आहे. केवळ भारतातच नव्हे तर दुसऱ्या देशांमध्येही गायींचा सन्मान केला जातो. धार्मिक ग्रंथांमध्येही गायींचा उल्लेख करण्यात आला आहे. असे म्हणतात की गायीच्या पोटात 33 कोटी देव असतात. जर गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळाला तर तिच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावलं उचलली जातील, जेणेकरुन गोहत्या बंद होतील''
दरम्यान, यावेळी विरोधीपक्ष नेत्या इंदिरा हृदयेश म्हणाल्या की, ''गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यास आमचा आक्षेप नाही. पण असे करुन भाजपाला नेमके काय सिद्ध करायचंय, हे समजण्यापलिकडे आहे. राज्यातील गोशाळांची दुरवस्था झाली आहे, तसंच वृद्ध झाल्यानंतर लोक गायीला सोडून देतात. राज्यात प्राण्यांच्या देखभालीसाठी रुग्णालयांची संख्या देखील कमी आहे''.
पुढे त्या असंही म्हणाल्या की, ''हा प्रस्ताव आणण्याऐवजी गायीचे वासरू मारलं जाणार नाही, गायींना योग्य ते अन्न मिळेल, गोशाळांची परिस्थिती सुधारण्यात यावी आणि वृद्धावस्थेतील जनावरांसाठी योग्य तो तोडगा काढवा''. दरम्यान, भाजपा, काँग्रेस आणि अन्य पार्टींच्या आमदारांचे मत जाणून घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी मतदानाच्या आधारावर प्रस्ताव पारित केला.