नवी दिल्ली: उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. येत्या काही महिन्यात उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण, त्यापूर्वीच भाजप सरकारमधील परिवहन व समाज कल्याण अल्पसंख्याक मंत्री यशपाल आर्य यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. 'भाजपमध्ये आता अंतर्गत लोकशाही नावाचा प्रकारच उरला नाही,' असं मत आर्य यांनी भाजप सोडताना व्यक्त केलं.
उत्तराखंडमधील दलिस समाजाचा सर्वात चेहरा असलेल्या कॅबिनेट मंत्री यशपाल आर्य यांच्यासोबत त्यांचे पुत्र आमदार संजीव आर्य हेदेखील काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. यशपाल आर्या यांनी सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि राहुल गांधीची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माहिती काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.
काँग्रेसमध्ये घरवापसी करताना यशपाल आर्य यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना यशपाल आर्य म्हणाले की, 'भाजपमध्ये आता काही लोकांच्या हातात सर्व अधिकार गेले आहेत. पक्षात आता अंतर्गत लोकशाहीला जागा उरली नाही. त्याउलट काँग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाहीला फार मोठं महत्व आहे. यामुळेच मी काँग्रसमध्ये पुन्हा येत आहे', असे मत त्यांनी व्यक्त केले.
कोण आहेत यशपाल आर्य ?69 वर्षीय यशपाल आर्य उत्तराखंडच्या राजकारणातील सर्वात मोठा दलित चेहरा आहेत. 1989 मध्ये यशपाल आर्य पहिल्यांदा उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडुन गेले होते. उत्तराखंडच्या स्थापनेपर्यंत ते उत्तर प्रदेशातील आमदार होते. पण, 2002 मध्ये उत्तराखंडच्या निवडणुकीत ते उत्तराखंड विधानसभेचे सदस्य झाले. आतापर्यंत यशपाल आर्य सहा वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. यशपाल आर्य सात वर्षापूर्वी उत्तराखंड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे आता काँग्रेस प्रवेशामुळे त्यांची घरवापसी झाली आहे.