एक मोठा आवाज झाला आणि बस नियंत्रणाबाहेर गेली आणि खोल दरीत पडली. अल्मोडामध्ये भीषण अपघात झाला आहे. ६३ प्रवाशांनी खचाखच भरलेली ४३ सीटर बस पौरी जिल्ह्यातील नैनीदांडा ब्लॉकमधील बारातकिनाथ येथून नैनीतालच्या रामनगरसाठी निघाली होती. बस कुपी गावाजवळ आल्यावर बसचा स्प्रिंग बेल्ट तुटल्याचा आवाज आला आणि दुसऱ्याच क्षणी बस २०० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात ३६ जणांचा मृत्यू झाला.
बसमधील २८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जणांचा रामपूरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातापूर्वी बसमधील वातावरण अगदी सामान्य होतं, असं बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितलं. काही लोक आपापसात बोलत होते. काही महिला मोबाईलमध्ये व्यस्त होत्या. याच दरम्यान बस कुप गावाजवळ आली असता येथील रस्ता अतिशय खराब होता. अशा स्थितीत बसचा वेगही मंदावला. बस ओव्हरलोड होती आणि काही लोक उभे होते.
बसने वळण घेतलं तेव्हा 'खटाक' असा मोठा आवाज आला, रस्ता खराब आहे, म्हणून काहीतरी खाली आलं असावं असं सर्व प्रवाशांना वाटलं. पण मात्र दुसऱ्याच क्षणी बस चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली आणि खोल दरीत पडली. यावेळी बसच्या दरवाजाजवळ असलेले काही लोक रस्त्यावर पडले. तर उर्वरित लोक बससह २०० मीटर खोल दरीत पडले.
या बस अपघातात कोणी पती, कोणी पत्नी, कोणी आई-वडील गमावले आहेत. बसमध्ये प्रवास करणारे मनोज आणि चारू हे त्यांची अडीच वर्षांची मुलगी शिवानी हिला घेऊन रामनगरकडे येत होते. मात्र पत्नी चारूचा बस अपघातात मृत्यू झाला. निरागस शिवानीच्या डोक्यावरून आईचं छत्र हरपलं आहे. शिवानीलाही गंभीर दुखापत झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.