देहरादून - उत्तरकाशीमध्ये भीषण अपघात झाला असून यात १७ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यमुनोत्रीसाठी जाणारी भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळल्यानं ही घटना घडली. यमुनोत्रीच्या डामटा हायवेजवळ ही घटना घडली. या बसमध्ये मध्य प्रदेशातील ४० प्रवासी होते. त्यातील १७ लोकांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
डीजीपी अशोक कुमार म्हणाले की, दुर्घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. सध्या याठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही बस उत्तरकाशीसाठी मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातून आली होती. बस यमुनोत्री नॅशनल हायवेवर डामटा येथे दरीत कोसळली. या दुर्घटनेनंतर खळबळ माजली. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली.
अमित शाह यांनी शोक व्यक्त केलाया दुर्घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला. उत्तराखंडमध्ये भाविकांची बस खोल दरीत कोसळल्याची दुर्घटना अत्यंत दु:खद आहे. याबाबत मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याशी चर्चा केली आहे. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफ टीम बचाव कार्य करत आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. NDRF ची टीम घटनास्थळी पोहचेल अशी माहिती त्यांनी दिली.