डेहराडून : देशात मानसूनची सुरुवात झाली असून, उत्तर भारतात पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. उत्तराखंडमध्येहीपाऊस लोकांसाठी खूप त्रासदायक ठरला आहे. पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे, याचा वाहनांना फटका बसत आहे. अशात डेहराडूनच्या शिमला बायपासवर पाण्याच्या प्रवाहात बस अडकल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल रोडवेजची चंदीगडहून हरिद्वारला जाणारी बस पूराच्या पाण्यात अडकली. यादरम्यान काही प्रवाशांनी खिडकीतून उडी मारुन तर काहींनी बसच्या छतावर चढून आपला जीव वाचवला. हे दृष्य इतके धक्कादायक होते की, थोडीही चूक झाली असती, तर प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असता.
नदीचे पाणी पुलावरुन वाहत असूनही चालकाने गाडी घातल्याने ही घटना घडली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना जीव गमवावा लागला असता. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. डेहराडूनमधील शिमला बायपास चौकाजवळ ही घटना घडली आहे. व्हिडिओमध्ये पूराच्या पाण्यात अडकेली एक बस दिसत आहे. माहिती मिळताच पटेल नगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर बसही रवाना करण्यात आली.