गुंतवणूकदारांना उत्तराखंडमध्ये आणण्यासाठी अहमदाबादमध्ये रोड शो; २० हजार कोटींहून अधिकचा करार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 10:51 AM2023-11-02T10:51:59+5:302023-11-02T10:52:28+5:30
उत्तराखंडमध्ये आगामी काळात ८ आणि ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या 'ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट'साठी अहमदाबाद येथे रोड शो पार पडला.
अहमदाबाद : उत्तराखंडमध्ये आगामी काळात ८ आणि ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या 'ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट'साठी अहमदाबाद येथे रोड शो पार पडला. या रोड शोमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या उपस्थितीत ५० हून अधिक उद्योग समूहांसोबत वीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या करारामध्ये अनेक नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला. अहमदाबादमध्ये आयोजित रोड शोमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध उद्योग समुहांची बैठक घेतली आणि सर्व गुंतवणूकदारांना शिखर परिषदेसाठी आमंत्रित करताना उत्तराखंडकडे उद्योजक कसे आकर्षित होतील यावर भर दिला.
करार करण्यात आलेले उद्योग समूह
शीतल ग्रुप अँड कंपनी, रँकर्स हॉस्पिटल, झिवाया वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड, एस्ट्रल पाईप्स, वरमोरा टाइल्स, गुजरात अंबुजा एमकेसी इन्सा इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि अमूल या कंपन्यांचा करारात समावेश आहे. याशिवाय कमोडिटी ट्रेडिंग, एडी मेहता लॉजिस्टिक्स, फ्रेंड्स अँड फ्रेंड्स ग्रुप ऑफ कंपनीज, पारेख व्हेंचर्स एलएलपी, व्ही मिलक एंटरप्रायझेस, आर्य ओशन लॉजिस्टिक पार्क, हिंदुस्तान ऑइल इंडस्ट्रीज, सुपॅक इंडस्ट्रीज, श्रीजी ग्रुप, एनबी ग्रुप, शांताकाराम निगम, अपोलो ग्रुप, संस्था, पंचकर्म हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स, साबरमती विद्यापीठ, लीला हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स, हॉप्स हेल्थकेअर, प्राइम फ्रेश, दत्त मोटर्स, नेक्सस इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड या देखील उद्योग समूहांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
'ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट'साठी उत्तराखंड सरकारकडून जोरदार तयारी केली जात असून अहमदाबादमध्ये हा सहावा रोड शो पार पडला. देहरादूनमध्ये होणाऱ्या बहुचर्चित कार्यक्रमाकडे अधिकाधिक उद्योग समूहांना आकर्षित करण्यासाठी उत्तराखंड सरकार कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. रोड शोमध्ये बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गुजरात ही भगवान श्रीकृष्णाची भूमी आहे. महात्मा गांधी, सरदार पटेल यांच्यासारख्या महापुरुषांची ही भूमी आहे. या भूमीने भारताला नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने जागतिक पटलावर एक वेगळी ओळख निर्माण केली असून आजच्या घडीला जगात भारताचा आदर आणि स्वाभिमान मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
उद्योगांच्या विकासाठी सरकार प्रयत्नशील - मुख्यमंत्री
उत्तराखंडमधील उद्योगांच्या विकासासाठी सरकारकडून सातत्याने काम केले जात असल्याचे मुख्यमंत्री धामी यांनी सांगितले. "उद्योगाशी संबंधित असलेल्या लोकांच्या सूचना तसेच सल्ला लक्षात घेऊन तीस नवीन धोरणे आखण्यात आली आहेत. 'उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट' दरम्यान अनेकांकडून मिळालेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी केली जात आहे. राज्यात गुंतवणूकीला चालना देण्यासाठी 'सिंगल विंडो सिस्टीम'ची निर्मिती करण्यात आली आहे", असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
कर्मभूमी बनवण्यासाठी उत्तराखंड हे उत्तम ठिकाण - धामी
उद्योगांसाठी उत्तराखंडची धरती चांगली असून राज्यातील डोंगराळ भागात गुंतवणूक करणाऱ्यांना अधिक प्रोत्साहन दिले जाईल, असे आश्वासन धामी यांनी दिले. राज्यातील सुविधांबद्दल बोलताना ते म्हणाले, "उत्तराखंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खूप काही आहे. राज्यात सहा हजार एकरची लॅंड बॅंक तयार करण्यात आली आहे. डोंगराळ भागात गुंतवणूक करणाऱ्यांना अधिक प्रोत्साहन दिले जाईल. उत्तराखंडचे नैसर्गिक सौंदर्य आणि उत्तम मानवी संसाधने गुंतवणूकदारांना आमच्या राज्यात येण्यासाठी आकर्षित करत आहे. राज्य सरकारकडून पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा समतोल साधण्याचे काम केले जात आहे. कर्मभूमी बनवण्यासाठी उत्तराखंड हे उत्तम ठिकाण आहे. हवाई, रेल्वे, रस्ते आणि रोपवे कनेक्टिव्हिटीसह राज्याचा झपाट्याने विस्तार होत आहे. यावर्षी आतापर्यंत ५२ लाखांहून अधिक भाविकांनी उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला भेट दिली." एकूणच मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रोड शोमध्ये उत्तराखंडमधील सुविधांचा आणि उद्योगजकांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनांचा पाढा वाचला.